आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कर्डिलेंची हकालपट्टी करा; शिवसेना आक्रमक, मुख्‍यमंत्र्याचा मात्र सबुरीचा सल्‍ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अहमदनगर येथील दोन शिवसैनिकांच्या खून प्रकरणातील आरोपी व सध्या अटकेत असलेले भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची हकालपट्टी करावी, या शिवसेनेच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. उलट शिवसेनेच्या मंत्र्यांनाच सबुरीचा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी आ. कर्डिले यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाणार नसल्याचे संकेत दिले.

 

दरम्यान, रास्ता रोको प्रकरणी शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेलाही चुचकारले आहे. त्यामुळे अहमदनगर खून प्रकरणी आक्रमक झालेल्या शिवसेनेची तलवार पुन्हा एकदा म्यान झाल्याचे बोलले जात आहे.


नगर महापालिकेच्या केडगाव प्रभागात पोटनिवडणुकीत वादातून  शिवसेनेच्या २ कार्यकर्त्यांची शुक्रवारी गोळ्या घालून हत्या झाली. यामागे भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे संगनमत असल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या दुहेरी खून प्रकरणातील आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली.


कठोर कारवाईचे आश्वासन - रामदास कदम

अहमदनगरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. या वादातूनच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे खून झाले असून यातील आरोपींपैकी एक आमदार कर्डिले यांची भाजपतून हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. पोलिस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या गंभीर प्रकरणात राष्ट्रवादी आणि भाजपच्या फक्त २० जणांवर गुन्हे दाखल झाले. दुसरीकडे रास्ता रोको केलेल्या पाच-सहाशे शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आ. कर्डिले यांच्या हकालपट्टीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले असले तरीही दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेत कर्डिलेंना अभय?
जलसंधारण मंत्री राम शिंदे वगळता भाजपचा कोणताही मोठा नेता नगर जिल्ह्यात नाही. मात्र शिंदेंची मर्यादित राजकीय शक्ती व जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे दुय्यम स्थान पाहता त्यांच्यावर भिस्त ठेवणे भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. अशा वेळी साम, दाम आणि दंड वापरून राजकारण करणारे कर्डिले भाजपसाठी राजकीयदृष्ट्या जास्त उपयुक्त ठरतात. हे गणित लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी कर्डिलेंवरील कारवाईच्या मुद्द्यावर मौन बाळगल्याची चर्चा आहे.

 

भाजप अामदार कर्डिले यांच्या पोलिस काेठडीत दोन दिवसांची वाढ

नगर | पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. साेमवारी न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपताच त्यांना मंगळवारी पुन्हा हजर करण्यात आले हाेते. पोलिसांनी कर्डिलेंवरील गुन्ह्यात भादंवि ३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढवल्याने कर्डिले यांना जामीन मिळू शकला नाही. दरम्यान, तोडफोड करणाऱ्या २२ जणांचीही पोलिस कोठडी मंगळवारी संपली. न्यायालयाने त्यांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर अामदार संग्राम जगताप यांच्या जामिनावर गुरुवारी निर्णय हाेणार अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाला फक्त गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन...

 

बातम्या आणखी आहेत...