आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी मुख्यमंत्री बोलतोय\' मध्ये २ कोटींचा घोटाळा; काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मी मुख्यमंत्री बोलतोय, हा कार्यक्रम ऑक्टोबर २०१७ मध्ये शेवटचा प्रसारित झाला. त्यानंतर हा कार्यक्रम झाला नसतानाही कार्यक्रमाची बिले मात्र काढण्यात आली असून न केलेल्या कामाचे महिन्याला १९ लाख ७० हजारांचे बिल एफरव्हेसेंट फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.


गेले १० महिने या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही. तसेच हा कार्यक्रम प्रसारित झाला नसतानादेखील आयोजन करणाऱ्या कंपनीला बिले अदा करण्यात आली आहेत. कार्यक्रम न करता या खासगी कंपनीला १० महिन्यांत २ कोटी ३६ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमासाठी शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाची यंत्रणा वापरण्यात येत होती. तरीसुद्धा आपल्या मर्जीतील कंपनीला फायदा व्हावा म्हणून भरमसाट रुपयांचे कंत्राट दिले गेले. सरकारने या कंपनीबरोबर जो करार केला, त्यात कार्यक्रम झाला नाही तरी पैसे अदा करावे लागतील, अशी अट करारात मान्य केल्याचा दावा सावंत यांनी केला. एफरव्हेसेंट फिल्म प्रा. लि. या खासगी कंपनीला जून २०१७ ते मे २०१८ या कालावधीसाठी “मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचे काम देण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या कंपनीची स्थापना हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी फक्त तीन महिने आधीच झाली होती, असे स्पष्ट करत कोणत्या निकषांवर या कंपनीची निवड करण्यात आली, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला आहे. 


आरोपात तथ्य नाही :  मुख्यमंत्री कार्यालय 
ज्या संस्थेवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आक्षेप आहे, ती संस्था केवळ ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या एका कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेली नाही. दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरील विविध शासकीय कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. यात मनुष्यबळ व साधने पुरवण्याचे काम समाविष्ट आहे.  या संस्थेची नियुक्ती ई-निविदा पद्धतीने करण्यात आली आहे. न झालेल्या कार्यक्रमांसाठीही पैसा देण्याची तरतूद करारपत्रात नाही, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने सचिन सावंत यांच्या आक्षेपावर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...