आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भसह खान्देशातील आठ तालुक्यात दुष्काळ, बाधित शेतकऱ्यांना मिळणार निविष्ठा अनुदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदर्भातील यवतमाळ, वाशीम आणि खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आज (बुधवार) राज्य सरकारने जाहीर केला. यंदाच्या कृषी हंगामात झालेला कमी पाऊस, भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धता, पेरणीखालील क्षेत्र आणि पीक पाहणी या सर्व बाबींचा विचार करून ही घोषणा करण्यात आली. परिणामी या आठ तालुक्यांमध्ये शासनातर्फे उपाययोजना  आणि मदतीबाबतचे स्थायी आदेश लागू झाले असून त्या अंतर्गत तातडीने आठ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतपिकांच्या 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे. 

 

यंदाच्या रब्बी हंगामातील परिस्थितीचा विचार करून यवतमाळमधील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर, यवतमाळ हे पाच तालुके, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड तर वाशीम जिल्ह्यातील वाशीम असे एकूण आठ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदानही दिले जाणार आहे. हे अनुदान 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. सन 2017-18 च्या रब्बी हंगामातील सातबारामधील पिकांच्या नोंदीच्या आधारे या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. हंगामातील अंतिम पैसेवारीच्या आधारे पिकांचे नुकसान ठरवण्यात येणार आहे. तर फळबागांच्या 33 टक्के नुकसानीची खात्री करण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या साहाय्याने छायाचित्रांद्वारे शेतीनिहाय पंचनामे करण्यात येणार आहेत. फळबागांचे उत्पादन सरासरी पीक उत्पादनाच्या 67 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास मदत मिळणार नाही. याशिवाय या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुटीच्या कालावधीतही राबवण्यात येणार आहेत. पुढील सहा महिन्यांपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. 

 

दिलासादायी उपाययोजनांबाबतचे स्थायी आदेश कोणते?  
- जमीन महसुलात सूट  
- सहकारी कर्जाचे पुनर्गठन  
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट  
- शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता  
- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर
- शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे

बातम्या आणखी आहेत...