आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Plane Crash: दैव बलवत्तर व महिला पायलटच्या प्रसंगावधानाने अनेक प्राण वाचले!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'अपघातग्रस्त चार्टर्ड विमान २० फूट अलीकडे पडले असते तर आमची इमारत बेचिराख झाली असती. केवळ आमचे दैव बलवत्तर आणि त्या विमानचालकांचे प्रसंगावधान यामुळे आता आम्ही जिवंत आहोत', अशा भावना चार्टर्ड विमान अपघातग्रस्त झालेल्या जागेपासून जवळच असलेल्या घाटकाेपरमधील जीवदया लेन गल्लीतील रहिवाशांनी व्यक्त केल्या. जीवदया लेन हा परिसर घाटकोपर मध्य रेल्वे स्टेशनपासून चालत पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. येथून वर्सोवा-अंधेरी हा उन्नत मेट्रोमार्गही गेला आहे. 


दुर्घटनाग्रस्त विमान थोडे पुढे जाऊन कोसळले असते तर मोठा अनर्थ झाला असता. येथून जवळच शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुख्य रनवे आहे. दुर्घटनाग्रस्त विमान तिकडे भरकटले असते, तरसुद्धा मोठा अनर्थ झाला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. गजबजलेल्या वस्तीत विमान कोसळल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.जीवदया लेनमध्ये अॅम्बुलन्स, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या गाड्या मोठ्या संख्येने होत्या. त्यात दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ओबी व्हॅन्सचीही भर पडली होती. पोलिसांना बघ्यांना हटवताना मोठी कसरत करावी लागत होती.


कर्कश आवाज अाला अन‌् धुराचे लाेट दिसले 
'शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारी सर्व विमाने आमच्या इमारतीवरूनच लँड होतात. विमानाचा कर्कश आवाज आम्हाला नवीन नाही. मात्र गुरुवारी दुपारी मोठा स्फोट झाला. प्रचंड भीती वाटली. बाहेर येऊन पाहिले तर समोरच आग आणि धुराचे लोट दिसले. काही वेळाने कळले की विमान कोसळले आहे', असे अपघातग्रस्त ठिकाणासमोरच्या मधुबन इमारतीमधील विनीता पटेल यांनी सांगितले. 


पायलटचे अाभार मानावे तितके कमीच अाहेत 
'दुर्घटनाग्रस्त विमान महिला चालवत होती असे कळते. खरे तर मोकळ्या जागेत हे विमान उतरवून त्या महिला पायलटने शेकडो लोकांचा जीव वाचवला आहे. त्याबद्दल तिचे आभार मानावे तितके कमीच आहेत', असे येथील जीवदया लेन परिसरातील रहिवासी ज्योती कुसूम यांनी सांगितले. 


जळालेले मृतदेह नेले तातडीने रुग्णालयात 
 'मी टू व्हीलरवर जीवदया लेनमधून चाललो होतो. विमान झाडाच्या फांदीला धडकले आणि त्याचा स्फोट होऊन कोसळले. १५ मिनिटांत अग्निशमन, पोलिस आले. आम्ही जळालेले मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोहाेचवले', अशी माहिती प्रथमेश लोखंडे या प्रत्यक्षदर्शी युवकाने दिली. 


जेवायला गेल्याने वाचले बांधकामावरील मजूर 
'दुपारी दीडच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि आग लागली. तेव्हा आम्ही सर्व जेवणासाठी गेलो होतो. येथे ३६ मजूर कामाला आहेत. काम करत असताना विमान कोसळले असते तर आम्ही आता जिवंत नसतो,' असे मूळचे छत्तीसगडच्या कौशल कुमार निशाद या मजुराने सांगितले. 

 

सकाळी पूजा..दुपारी अपघात...

कोठारी बंधू यांच्या यूआय एव्हिएशन कंपनीने 2014 मध्ये व्हीटी यूपीझेड किंग एअर सी- 90 हे विमान उत्तर प्रदेश सरकारकडून खरेदी केले होते. विमानाची दुरूस्ती करून आज (गुरुवार) सकाळी पूजा करण्‍यात आली होती. श्रीफळ फोडून जुहू हेलिपॅडवरून टेस्टिंगसाठी विमानाने उड्डाण घेतले होते. परंतु दुपारी सव्वाच्या सुमारास विमान कोसळले.

 

या भीषण अपघातात महिला वैमानिक मारिया कुबेर, सह-वैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ मनिष पांडे आणि सुरभी यांचा जागीच मृत्यू झाला. पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

 

उत्तरप्रदेश सरकारचे स्पष्‍टीकरण..

चार्टर्ड विमान यूपी सरकारकडे असताना त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर हे विमान सरकारने विक्री काढले होते, अशी माहिती यूपी सरकारचे मुख्य सुरक्षा सल्लागार अवनिश अवस्थी यांनी दिली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...