आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह कल्याण, कर्जतला पावसाने झोडपले; लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मार्ग बदलला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाने शनिवारी मुंबईला चांगलेच झोडपून काढले. केवळ मुंबईच नव्हे तर  कल्याण, कर्जत, कसारा, माथेरानपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आल्याने मध्य रेल्वेची लोकलसेवा कासवाच्या गतीने चालत होती. पावसामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या. हवामान खात्याने आगामी पाच दिवसांत मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

उपनगरांमध्येही पावसाने जोर धरल्याने रुळावर पाणी आले. रुळांवर जवळपास 10 ते 11 सेंमी. पाणी साचले होते. सकाळच्या वेळेसच पाऊस आल्याने रेल्वे रुळावर पाणी साठले त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.तसेच  कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवलीतील अनेक घरांमध्ये पाणी साचले. कल्याण ते कर्जत दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रुळावर पाणी आल्याने भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गावरुन वळवण्यात आली.

 

शुक्रवारी रात्रीपासून पावसाने मुंबईत जोर धरला होता. या पावसामुळे दादर, हिंदमाता, अंधेरी, वांद्रे, सायन, चेंबूर, दक्षिण मुंबई, गोरेगाव इत्यादी ठिकाणी पाणी साठल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. पावसामुळे मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. खड्ड्यांमुळे या महामार्गावर एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सीबीडी बेलापूर आणि तुर्भे परिसरातील रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्याने या भागातही वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतुक कोंडीमुळे मुंबई आणि पनवेलच्या दिशेने येणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत होता. शनिवारी सकाळी 11 ते 12 या एक तासात कांदिवली 31, बोरिवली 26, दिंडोशी 21, घाटकोपर 40, मुलुंड 28, भांडूप 19 आणि विक्रोळी येथे 11 मिमी पावसाची नोंद झाली.

दुपारनंतर पाऊस ओसरल्याने रुळावरील पाणी कमी झाले तरी रेल्वे वाहतूक कोलमडलेलीच होती. सर्व गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. मुसळधार पावसाचा माथेरानच्या ट्रॉय ट्रेनच्या मार्गावरील अमन लॉज ते माथेरान दरम्यान रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने ट्रॉय ट्रेन बंद पडली.

 

ठाणे, वसई-विरार आणि रायगडमध्येही मुसळधार पाऊल पडला. रायगडमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरले तर काळ आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

खेड आणि महाडमध्ये उधळे गावाजवळ मुसळधार पावसामुळे चोरटी नदीचं पात्र विस्तारल्याने मुंबई-गोवा महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीच्या रांगा लागल्या होत्या. भिवंडीतील शेलार परिसर, नदी नाका आणि तीन बत्ती परिसरात पावसामुळे पाणी साठले तर पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हारमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. मुरबाडच्या उल्हास नदीला पूर आल्याने कल्याण-मुरबाड मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जलमल झालेल्या मुंबईसह उपनगराचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...