Home | Maharashtra | Mumbai | Maharashtra bandh On 9 August Kranti din by Maratha Kranti Morcha

आज महाराष्ट्र बंद: १० ऑगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा १५ ऑगस्टपासून चूल बंद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 09, 2018, 05:44 AM IST

कोर्टाचा सन्मान राखून ९ ऑगस्ट राेजी अहिंसात्मक, असहकार व शांततेच्या मार्गाने 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात अाली अाहे.

 • Maharashtra bandh On 9 August Kranti din by Maratha Kranti Morcha
  मराठवाड्यात बंदोबस्त वाढवण्यात आला असून उस्मानाबादेत पोलिसांनी बुधवारी पथसंचलन केले.

  औरंगाबाद- मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आश्वासने नकोत, ठोस अंमलबजावणी हवी. सरकारवर आमचा विश्वास नाही. म्हणूनच समाजाच्या विविध २० मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोर्टाचा सन्मान राखून ९ ऑगस्ट राेजी अहिंसात्मक, असहकार व शांततेच्या मार्गाने 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात अाली अाहे. बुधवारी अाैरंगाबादेत समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला.


  १० ऑगस्टला आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा १५ ऑगस्टपासून एक वेळ चूल बंद, अन्नत्याग आंदोलनास सुरुवात होईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील, प्रा. चंद्रकांत भराड, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, रवींद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २१ जुलैपासून उपोषण, ठिय्या, रास्ता रोको, जलसमाधी, आक्रोश, बाेंबा मारो अशा अनेक प्रकारे आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी हिंसक वळण लागले. काही सुशिक्षित मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. हे हिंसक आंदोलन व आत्महत्या थांबाव्यात म्हणून ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने बुधवारी बैठक घेण्यात आली. या वेळी राजेंद्र जंजाळ, सुरेश वाकडे, विजय काकडे, मनोज गायके, डॉ. कल्याणराव काळे, जगन्नाथ काळे, मिलिंद पाटील, उदय पाटील, अभिजित देशमुख व्यंकटेश शिंदे, शांताराम कुंजीर आदींसह ३२ जिल्ह्यांतील समन्वयक हजर होते. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा अाढावा घेतला.


  अाज नाशकात बंद किंवा चक्का जाम नाही...
  नाशिकमध्ये बंद किंवा चक्काजाम अांदाेलन होणार नाही. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना, तर ग्रामीण भागात तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे.


  आंदोलनाचे ८ दिवसांचे धोरण केले जाहीर
  > ९ ऑगस्टला सूर्याेदय ते सूर्यास्तापर्यंत महाराष्ट्र बंद.
  > अॅम्ब्युलन्स, शाळेच्या बस, मेडिकल, एसटी, धार्मिक यात्रा वाहने वगळणार.
  > हिंसाचाराला थारा नाही. आंदोलक, लहान मुले ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत रास्ता रोको, ठिय्या, उपोषण, आक्रोश आंदोलन करतील.
  > १० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरकारने आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.
  > आत्महत्या व हिंसाचार रोखण्यासाठी तीन दिवस संवाद यात्रेद्वारे १० ते १२ ऑगस्टपर्यंत प्रबोधन, ज्ञानदानाचे कार्य.
  > २१ मराठा तरुणांनी आत्मबलिदान केले. त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि एकाला नोकरी द्यावी.


  आमचा लढा सरकारशी, पोलिसांशी नाही
  सरकारवर दबाव कायम ठेवण्यासाठी पुढील दिशा निश्चित करण्यावर बैठकीत एकमत झाले. हिंसाचार थांबवण्यासोबतच आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचेही ठरले. गुरुवारी महाराष्ट्रात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय झाला. 'आमचा लढा सरकारशी आहे, पोलिसांशी नाही. हे प्रथम पोलिस प्रशासनाने समजून सहकार्य करावे. आंदोलनाला गालबोट लागता कामा नये', असा ठरावही संमत करण्यात आला.


  बहुतांश जिल्ह्यांत शाळांना सुटी
  आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतील शाळांना सुटी जाहीर केली आहे. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंबंधीचे पत्रक काढले आहे. त्यामुळे विभागातील बहुतेक सर्व खासगी आणि शासकीय शाळा बंद राहतील.


  राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या
  > शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले असले तरी समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाच तर बंदोबस्त म्हणून राज्य राखीव पोलिस दलासह शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
  > नांदेडमध्ये बस पेटवली बाळापूर-हदगाव मार्गावर एका बसला जाळण्याचा प्रयत्न काहींनी केला. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. चालक दत्ता बाभूळकर व वाहक गंगाप्रासाद पाटे यांनी त्वरित तत्परता दाखवत प्रवाशांना बसखाली उतरवले.


  मुंबई बंद, मात्र नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याला वगळले
  मुंबई : ९ ऑगस्ट क्रांतिदिनी नवी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंद पाळण्यात येईल, असे सकल मराठाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले. दादर शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुस्लिम समाजातील काही नेत्यांचाही बंदला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील आंदोलनात काही अनुचित घडल्यास त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल, असा इशारा जाधवराव यांनी दिला.

Trending