आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- पंजाब नॅशनल बँकेची ११ हजार ५०० कोटींची फसवणूक करणारा व सध्या इंग्लंडमध्ये पळालेला मुंबईचा प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी याचा अलिबाग येथील समुद्रकिनारी असलेला बेकायदा बंगला पाडण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी त्यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
मंत्रालयात मंगळवारी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी बांधलेल्या बेकायदा बंगल्यावरील कारवाईसंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नीरव मोदी याचा बंगला पाडण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिल्याचे पत्रकारांना सांगितले.
कदम म्हणाले, अलिबाग तालुक्यात समुद्रकिनारी १२१ आणि त्यालगतच्या मुरुड तालुक्यात १६१ बेकायदा बंगले आहेत. त्यातील १०१ बंगल्यांवरील कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नीरव मोदी याचा बंगला किहीम गावी असून पंजाब बँक घोटाळ्यातील दुसरा आरोपी व मेहुल चोक्सीचा बंगला आवास गावी आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी जे २७१ बेकायदा बंगले आहेत, ते सर्वच्या सर्व किनारी नियमन कायद्याचे (सीआरझेड) उल्लंघन करून बांधलेले असून ते अनधिकृत बांधकाम आहे. या बंगल्यावरील कारवाईवरची न्यायालयाने स्थगिती उठवावी, यासाठी विभाग प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
उशिराचे शहाणपण
अलिबागमधील बेकायदा बंगल्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरेंद्र ढवळे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यादरम्यानच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला नीरव मोदी याच्या बंगल्यावरील कारवाईसाठी पुढाकार घेण्यासंदर्भात बजावले होते. त्यानंतर राज्याच्या पर्यावरण विभागाला जाग आली आहे.
‘ईडी’ने जप्त केला आहे बंगला
नीरव मोदी पंजाब बँकेला गंडा घालून देशाबाहेर पळाल्यानंतर त्याचा अलिबागचा बंगला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केला आहे. त्यामुळे तो बंगला कसा पाडणार? यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना विचारणा केली असता, ‘कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येईल’, असे ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.