आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा धसका; गुजरातचे दूध मुंबापुरीत पोहोचलेच नाही, स्वाभिमानी रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबर्इ- मुंबर्इकरांची दूध कोंडी होऊ नये यासाठी अहमदाबाद- मुंबर्इ सेंट्रल पॅसेंजर गाडीला दुधाचे टॅंकर जोडून ते मुंबर्इत आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने परवानगी दिली होती. त्यानुसार बुधवारी ही गाडी दुपारी मुंबर्इत येणे अपेक्षित होते. परंतु स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट डहाणू रोड रेल्वे स्थानकातच आंदोलन केले. पॅसेंजर गाडी आली पण त्या गाडीला दुधाचे टॅंकर जोडलेले नव्हते.

 

दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनावर अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नसल्यामुळे त्याचा फटका मुंबर्इकरांना बसणार आहे. दूधाचासाठा संपत आल्यामुळे गुरूवारी मुंबर्इसह उपनगराला 25 ते 30 टक्के दूध तुटवड्याला तोंड द्यावे लागण्याची भीती दूध वितरकांनी व्यक्त केली आहे. आंदोलन आणखी चिघळल्यास शुक्रवारी 50 टक्के दूध तुटवडा जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे मुंबर्इत दुधाची टंचार्इ निर्माण होऊ नये यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पश्चिम रेल्वेला दुधाची व्यवस्था करण्यासाठी निर्देश दिले हाेते. त्यानुसार पश्चिम रेल्वेने मंगळवारी ट्यवीट करून अहमदाबाद- मुंबर्इ सेंट्रल या पॅसेंजर गाडीला दुधाचे दोन अतिरिक्त टॅंकर जोडण्याची परवानगी देत असल्याचे सांगितले होते. गुजरात सीमेवर आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडून बसलेल्या राजू शेट‌्टी यांना याची कुणकुण लागली. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळी डहाणू रोड रेल्वेस्थानक गाठून तिथेच ठिय्या मांडून सरकार विरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही पॅसेंजर डहाणू स्थानकात आली. परंतु या गाडीला दुधाचे टॅंकर जोडलेले नव्हते. त्यामुळे प्रवाशांना आंदोलनाचा नाहक त्रास नको म्हणून ही गाडी मुंबर्इच्या दिशेने रवाना करण्यात आली.

 

आम्हाला चकवा देऊन गुजरातवरून 4 लाख 40 हजार लिटर दुध मुंबर्इला आणण्यात येणार होते. परंतु गुजरातमध्येच हे टॅंकर जोडण्यात आले नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या झटक्यानंतर केंद्र आाणि राज्य सरकारला माघार घ्यावी लागली आणि गुजरातवरून मुंबर्इला रेल्वेने येणारे दूध रद्द करावे लागले. दूधासाठी आमचे आंदोलन सुरूच राहील असे राजू शेट‌्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले. आंदोलकांच्या भावना तीव्र असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो अशी परिस्थिती लक्षात आल्यानंतर गुजरातमधून मुंबईत येणारे दूध थांबविण्यात आल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

 

जनावरे, बायका- मुलांसह चक्का जाम करणार
दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान मिळावे या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी दोन दिवसांपासून काही ठिकाणचा अपवाद वगळता आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र आजही राज्य सरकारकडून त्यावर काहीच तोडगा काढण्यात आलेला नाही. उलट आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचे नाही. त्यामुळे उद्यापासून  जनावरे, बायका-मुले घेऊन शेतकरी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली.

 

मुंबईला २५ टक्के तुटवडा जाणवणार
दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या अांदाेलनावर काेणताच ताेडगा निघालेला नसल्यामुळे त्याचा फटका मुंबईकरांना बसणार अाहे. दुधाचा साठा संपत अाल्यामुळे गुरुवारी मुंबईसह उपनगराला २५ ते ३० टक्के दूध तुटवड्याला ताेंड द्यावे लागण्याची शक्यता दूध वितरकांनी व्यक्त केली. अांदाेलन अाणखी चिघळल्यास शुक्रवारी ५० टक्के दूध तुटवडा जाणवण्याची शक्यता अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...