आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • माता न तू वैरिणी: दुसराही मुलगाच झाला..नावडत्या मुलाला आईनेच ड्रममध्ये बुडवून मारले Mother Killed Her Child Of Ten Month

AURANGABAD: माता न तू वैरिणी: दुसराही मुलगाच..नावडत्या मुलाला आईनेच ड्रममध्ये बुडवून मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मला मुलगी पाहिजे होती, परंतु मुलगाच झाला व तो मला आवडत नव्हता म्हणून मीच त्याचा खून केला, अशी कबुली वेदिका परमेश्वर एरंडे हिने बिडकीन पोलिसांना दिली.


मातृत्वाला कलंकित करणाऱ्या या घटनेचा तपशील असा की, पैठणखेडा येथील लिंबादास खैरे यांची मुलगी वेदिका हिचा गंगापूर तालुक्यातील परमेश्वर एरंडेशी विवाह झाला. तिला दोन मुले असून मोठा चार वर्षांचा तर प्रेम हा दहा महिन्यांचा होता. परमेश्वर हा चितेगाव येथील कंपनीत कामाला असल्यामुळे एरंडे दांपत्य चितेगावातच राहतात. दरम्यान, वेदिका ही दहा महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन माहेरी पैठणखेडा येथे गेली. २३ जून शनिवार रोजी रात्रीचे जेवण करून सर्व झोपी गेले. त्यावेळी प्रेम आईशेजारी झोपला होता. रात्री कुटुंबीयाला जाग आली तेव्हा प्रेम जागेवर नव्हता. शोध घेतला तरी प्रेम सापडला नाही तेव्हा तत्काळ बिडकीन पोलिसांना ही घटना कळवण्यात आली व प्रेमला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद वेदिकाने पोलिसांना दिली.


पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पैठणखेडा येथे धाव घेतली. नातेवाईक व ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रेमचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अगोदरच मुले पळवणाऱ्या टोळीबाबत अफवा व त्यात ही घटना घडल्याने पोलिसही सतर्क झाले. अधिक तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वान घराच्या परिसरातील ड्रमभोवतीच फिरत असल्याने पोलिसांनी ड्रमवरील झाकण बाजूला करून बघितले असता ड्रममध्येच प्रेमचा मृतदेह आढळला. त्यास ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घरासमोरील ड्रममध्येच पोलिसांना मृतदेह आढळल्याने पोलिसांना कुटुंबीयांवरच संशय आला.


त्यादृष्टीने सर्व कुटुंबीयांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्रेमची आई वेदिका हिने मला पहिला मुलगा आहे तेव्हा दुसरी मुलगी हवी होती. मात्र मुलगा झाला. प्रेम मला आवडत नव्हता तेव्हा आपणच त्याला मारल्याचे वेदिकाने कबूल केले, अशी माहिती सपोनि पंडित सोनवणे यांनी दिली. या प्रकरणी वेदिका विरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास केला. या प्रकरणी पुढील तपास सपोनि पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल ऐटवर, राणी सावंत, जमादार प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई तुळशीराम गायकवाड करत आहेत.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... दुसरा प्रयत्न झाला यशस्वी

 

बातम्या आणखी आहेत...