आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभव राऊतच्या घरातून अाणखी शस्त्रास्त्रे जप्त, एसटीएसची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  नालासोपारा येथून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतच्या घराची एटीएसच्या पथकाने बुधवारी पुन्हा एकदा तपासणी केली. या झडतीदरम्यान वैभव राऊतच्या मालकीची एक इनोव्हा कारही पोलिसांनी जप्त केली. या झडतीची बातमी कळताच राऊतच्या घरासमोर त्याचा मित्रपरिवार, शेजारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी करत आरोपीच्या चेहऱ्यावरचा बुरखा हटवण्याची मागणी केली. चौकशीदरम्यान राऊतकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याच्या हेतूने ही तपासणी झाल्याचे समजते.   


नालासोपारा येथील भांडार आळीतील राऊतच्या घरी एटीएसचे पथक बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पोहोचले. साधारण पावणेचारपर्यंत या पथकाने वैभव राऊतच्या घराची झडती घेतली. या पथकाने वैभवलाही सोबत आणले होते. झडतीदरम्यान राऊतची गाडी, लॅपटॉप आणि आणखी काही हत्यारेही पथकाने जप्त केल्याची माहिती पोलीस विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, एटीएसचे पथक आल्याचे कळताच वैभवच्या घरासमोर शेजारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. झडती आटोपून घराबाहेर पडणाऱ्या एटीएस पथकाकडे आरोपीच्या चेहऱ्यावरील बुरखा हटवण्याची मागणी या जमावाने केली. तसेच वैभव राऊतच्या समर्थनार्थ काही घोषणाही दिल्या. मात्र स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त लावल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.   


कारमधून स्फोटकांची वाहतूक झाल्याचा संशय  
या प्रकरणाची चौकशी करतानाच पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यावरही भर दिला आहे. याच अनुषंगाने राऊतची गाडी जप्त करण्यात आली असून या गाडीतून स्फोटकांची वाहतूक झाली असल्याचा एटीएसला संशय आहे. या गाडीची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, वैभव राऊत प्रकरणाच्या चौकशीदरम्यान एटीएसला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले अाहेत. पुणे आणि मुंबई एटीएसची पथके या चौकशीत सहभागी झाली असून प्राथमिक चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळत असल्याने एटीएसने चौकशीची व्याप्ती वाढवण्यात आल्याचे समजते.

 

बातम्या आणखी आहेत...