आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालासोपाऱ्यातील शस्त्रांसाठी पांगारकरकडून अार्थिक रसद; २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नालासाेपाऱ्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊत याच्याकडून माेठ्या प्रमाणावर जप्त करण्यात अालेल्या शस्त्रसाठ्यासाठी जालन्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक व सनातनचा साधक श्रीकांत पांगारकर यानेच अार्थिक रसद पुरवल्याचा दावा दहशतवादविराेधी पथकाच्या (एटीएस) वतीने साेमवारी मुंबई सत्र न्यायालयात करण्यात आला. श्रीकांत हा प्रशिक्षित आरोपी असून त्याच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करण्याची गरज असल्याचेही सरकारी पक्षाने सांगितले. त्यावरून न्यायालयाने २८ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.   


नालासोपारा येथे हत्यारे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करत एटीएसने वैभव राऊत आणि शरद कळसकर यांना नालासोपारा येथून, तर सुधन्वा गोंधळेकर याला सातारा येथून अटक केली होती. या तिघांच्या चौकशीदरम्यान श्रीकांत पांगारकर याचे नाव समोर आल्याने त्यालाही शनिवारी रात्री उशिरा जालन्यातून अटक करण्यात आली होती. सोमवारी त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. श्रीकांत हा प्रशिक्षित आरोपी असून त्याने घातपात घडवण्यासाठी कुठून प्रशिक्षण घेतले याचा तपास करणे गरजेचे असल्याचे सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. तसेच याअगोदर अटक तिघांना श्रीकांत पांगारकर याने आर्थिक मदत केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्या अनुषंगाने त्याच्या आर्थिक व्यवहारांची तसेच बँक खात्याची तपासणी करण्याची गरजही सरकारी पक्षातर्फे अधोरेखित करण्यात आली. अटकेच्या वेळी पांगारकर याच्या घरून एक पेनड्राइव्ह, काही कागदपत्रे व एक हार्ड डिस्कही जप्त केली असून त्याबाबतची चौकशीही करायची असल्याचेही सरकारी वकिलांनी सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेले आरोपी हे छोटी प्यादी असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पकडला जाण्याची गरजही सरकारी वकिलांनी व्यक्त केली.   


ईदला घातपाताचा कट?
स्वातंत्र्यदिन आणि बकरी ईद सणाच्या दिवशी राज्यात विविध ठिकाणी घातपात घडवण्याचा वैभव राऊत व त्याच्या साथीदारांचा कट होता. त्यासाठीच माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात अाला हाेता. तसेच डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतही या टोळक्याचा सहभाग होता का याचा तपास करणे गरजेचे असल्याचेही एटीएसच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. पाडळकर यांनी पांगारकरची पाेलिस काेठडीत रवानगी केली.


जालन्यातील आणखी एका व्यक्तीची चौकशी
जालना : डॉ. दाभोलकर हत्याकांडात जालन्यातील अाणखी एका संशयितास रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात अाले. १५ मिनिटे चाैकशी करून त्याला साेडून देण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाभाेलकर हत्या व नालासाेपारा शस्त्रसाठाप्रकरणी पांगारकरला अटक केल्यानंतर एटीएसने जालना शहरातील संशयितांची चाैकशी सुरू केली अाहे. त्याच अाधारे जुना जालना भागातील एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे पांगारकरबाबत चाैकशी करून साेडून देण्यात आले. 


पांगारकरच्या ‘लिंक’ची माहिती : खोतकर
मुंबई : पांगारकर याचे सनातनशी संबंध असल्याची पूर्वी कल्पना होती. मात्र, त्याने २०११ मध्येच शिवसेना सोडल्याने त्याकडे आपण लक्ष दिले नाही, असे राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ते म्हणाले, ‘पांगारकर जालना पालिकेत २००१ ते २०११ पर्यंत शिवसेनेचा नगरसेवक होता. तिकीट नाकारल्यानंतर त्याने २०११ मध्ये शिवसेना सोडली. नंतर मला कळले की, तो सनातनच्याच कामात जास्त सक्रिय झाला. तो शिवसेनेत नसल्याने त्याच्याबद्दल जाणून घेण्याची गरज भासली नाही. पांगारकरच्या हिंसक प्रवृत्तीबद्दलच्या प्रश्नावर मात्र अापल्याला काहीच कल्पना नसल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.


सनातनवर बंदीचा प्रस्ताव अाम्ही पाठवला : केसरकर
२०११ मध्ये अाघाडी सरकारने सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला हाेता. मात्र त्यांनी त्रुटी काढून ताे परत पाठवला हाेता. अाम्ही या त्रुटी दूर करून नव्याने हा प्रस्ताव पाठवला. ताे केंद्राकडे प्रलंबित अाहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

 

कोण आहे श्रीकांत पांगारकर?
- श्रीकांत पांगारकर याचे जालना शहरातील महसूल कॉलनीत घर आहे.
- 2001 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पांगारकर याने भाग्य नगर भागातून पालिका निवडणूक लढवली होती.
- 2006 मध्येही तो शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला होता.
- मात्र, पक्षात फारसा सक्रिय न राहिल्याने 2011 मध्ये त्याला उमेदवारी देण्यात आली नाही.
- या काळात त्याचा संबंध हिंदू जनजागृती संघटनेशी आला. नंतर तो या संघटनेचा सक्रिय सदस्य म्हणूनच कार्यरत होता.
- आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा पांगारकरचा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...