आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालासोपारा स्फोटके प्रकरणी राज्यभरात 12 जण ताब्यात; ऐन सणासुदीच्या दिवसांत घातपात घडवण्याचा कट?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने आपली कारवाई अधिक तीव्र करत राज्यभरातून आणखी 12 जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण शुक्रवारी अटक केलेल्या तीन प्रमुख आरोपींच्या नियमित संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जात असून नेमके या संपूर्ण कटाचे लक्ष्य कोण होते याचा तपास एटीएसद्वारे केला जात आहे. तसेच यापूर्वी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांशी या आरोपींचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास केला जात आहे.

 

गोवंश रक्षा समिती आणि हिंदू जनजागृती समितीशी संबधित असलेल्या वैभव राऊत आणि अटकेत असलेल्या इतर दोन आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने राज्यभरातून आणखी 12 जणांची धरपकड केल्याचे समजते. ऐन सणासुदीच्या दिवसांत घातपात घडवण्याचा या टोळक्याचा कट होता का, याचा तपास केला जात आहे. या कटाची व्याप्ती नेमकी किती आहे, याबाबत विशेष करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणलेली स्फोटके नेमकी कशी आणि कुणाकडून आणली गेली, तसेच ती कुठे वापरली जाणार होती, त्यांचा हेतू नेमका काय होता, हे शोधण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान नालासोपारा येथील भांडार आळीतील एका सीसीटीव्हीचे फुटेज स्थानिक पोलीसांनी जप्त केले आहे. गेल्या आठ पंधरा दिवसांत वैभव राऊतला भेटायला कोणी आले होते का याची तपासणी या फुटेजद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी स्थानिक माध्यमांना दिली.

 

दरम्यान हिंदु विधिज्ज्ञ परिषदेच्या अॅड. संजीव पुनाळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एटीएसच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अटकसत्र आणि चौकशीच्या नावाखाली आरोपींचा छळ असल्याचा आरोपही त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. तसेच आरोपींना अटक करताना पोलीसांनी केलेला पंचनामा सदोष असल्याचा दावा करत पुनाळेकरांनी संपुर्ण घटनेत संस्थेला नाहक बदनाम करण्यात येत असल्याचा आरोपही केला आहे. 

 

शनिवारी एटीएसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवारी अटक केलेल्या तीन आरोपींकडून बाँम्ब बनवण्याची पुस्तके सापडली असून बॉम्ब कसा बनवायचा, लक्ष्य कसे निश्चित करायचे आणि लक्ष्यावर बॉम्ब लावल्यावर पुढे कोणती काळजी घ्यायची याबाबतच्या सुचनांचा समावेश असलेली कागदपत्रे सापडल्याचे स्पष्ट होत आहे. या पत्रकात आरोपींकडून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा तपशीलही देण्यात आला आहे. 10 गावठी पिस्टल मॅग्झीन, 1 गावठी कट्टा, 1 एअर गन, 10 पिस्टल बॅरल, 6 अर्धवट तयार पिस्टल, 6 पिस्टल मॅग्झीन, 3 अर्धवट तयार मॅग्झीन, 7 अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, 16 रिले स्विच, 6 वाहनांच्या नंबर प्लेट्स, 1 ट्रिगर मॅग्झीन, 1 चॉपर आणि एका स्टील चाकूचाही या हत्यारांमध्ये समावेश आहे.

 

बातम्या आणखी आहेत...