आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहनशीलतेचा अंत पाहू नका; नाराज राणेंचा इशारा, जानेवारीअखेर मंत्रिमंडळात समावेश !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रिमंडळात समावेश होईल या भाजपच्या आश्वासनानंतर नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची मोट बांधली. परंतु भाजपने तारीख पे तारीख असेच सत्र सुरू ठेवल्याने राणे नाराज झाले आहेत. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मंत्रिमंडळ समावेशाबाबत लवकर निर्णय घ्या, असा सूर नारायण राणे यांनी लावला आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी संबंधित वक्तव्य केले. राणे यांचा जानेवारीअखेर मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो,  असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.   


ऑक्टोबरमध्ये नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि एनडीएला पाठिंबा जाहीर केले. त्याच वेळेस त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे सांगितले जात होते. राणे यांनी वेळोवेळी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आज-उद्या अशी अनेक आश्वासने त्यांना दिली. परंतु त्यांचा मंत्रिमंडळात समावेश काही झाला नाही. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. मात्र, राणेंना तिकीट न देता प्रसाद लाड यांना भाजपने निवडून आणले आणि राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश लांबला. त्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये नारायण राणे यांनी स्वतःच ३१ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात समावेश होईल, असे वक्तव्य केले होते. परंतु ३१ डिसेंबरची तारीखही उलटून गेल्याने नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत आणि हीच नाराजी त्यांनी अखेर व्यक्त केली. राणे यांच्या नाराजीनंतर भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार हे नक्की आहे. परंतु तो होत नसल्याने ते नाराज असणे स्वाभाविक आहे. काही कारणास्तव त्यांचा प्रवेश लांबला असला तरी तो जानेवारीअखेरपर्यंत नक्की होईल, असेही या नेत्याने स्पष्ट केले.   

 

नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका   
कोकणातील राजापूर नाणार प्रकल्पाबाबत  राणे म्हणाले, हा प्रकल्प शिवसेनेने पैशासाठी आणला असून शिवसेना कोकणचा विनाश करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून धमकी देण्यात आली. त्यांना कसले तरी इंजेक्शन देण्यात आले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना मारण्याचा शिवसेनेचा कट होता का, याची चौकशी करावी, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली. हा प्रकल्प भाजपने आणल्याचे शिवसेना सांगते.  मात्र,  राज्याचे आणि केंद्रातील उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे एका बाजूला विरोध दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना प्रकल्पाच्या जमिनीसाठी धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत. शिवसेनेचे मंत्री असताना त्यांना सांगून उद्धव ठाकरे संबंधित प्रकल्प रोखत का नाहीत, असा प्रश्नही नारायण राणे यांनी या वेळी उपस्थित केला.

 

 

18 गावातील ना‍गरिकांचा विरोध..

कोकणातील 18 गावातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. कोकणात एकूण 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. या भागात 7 लाख आंब्यांची झाडे आणि 2 लाख काजूची झाहे आहेत, जगातला प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रातला आहे, असेही राणेंनी सांगितले.

 

स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार 'स्वाभिमान'
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे. आघाडी झाली तर सिंधुदुर्गमधील तीन आमदार व एक खासदार पदाची जागा लढविण्याचा हक्क सांगितला जाईल, असे राणेंनी कुडाळ येथे काही दिवसांपूर्वी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...