आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून प्लास्टिक बंदी, ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड; उल्लंघन केल्यास तीन महिन्यांपर्यंत कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारने पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोझेबल वस्तू, त्यांचे उत्पादन आणि वापरावर राज्यात लागू केलेल्या बंदीची शनिवारपासून (२३ जून) अंमलबजावणी होत आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ५ ते २५ हजारांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. 


दंड कमी होणारच नाही
बंदीच्या निर्णयाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन रामदास कदम यांनी केले. ते म्हणाले, 'येत्या आठ दिवसांत प्लास्टिक बंदीसदंर्भात राज्यभर मोठी जनजागृती मोहीम विभाग हाती घेत आहे. त्यामुळे सर्व संभ्रम दूर होतील. बंदी मोडणाऱ्यांना दंडाची शिक्षा कमी करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असेही कदम यांनी निक्षूण सांगितले. 


नोटबंदीसारखा एका रात्रीतून निर्णय झाला नाही
नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे प्लास्टिक बंदीचा निर्णय एका रात्रीत घेतलेला नाही. नऊ महिन्यापासून जनजागृती सुरू आहे. दंडाच्या रकमेची चिंता ज्यांना स्वेच्छेने प्लास्टिक बंदीचे नियम मोडायचे आहेत, त्यांनी करायला हवी.
- अादित्य ठाकरे, शिवसेना नेते


> प्लास्टिक बंदीच्या निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या यापूर्वीच्या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित होते. आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीला आदित्य हजर राहिले. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पालिका जेव्हा अत्यंत महत्वाच्या निर्णयाची घोषणा करते, त्या त्या वेळी आदित्य हजर राहिलेले आहेत.
> राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती. मात्र प्लास्टिक उद्योजकांचा विरोध आणि राज्यात उडालेला गोंधळ लक्षात घेता बंदी मागे घेतली. मुंबईत ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर पूर्वीपासून बंदी लागू आहे. तरी सर्रास त्या वापरल्या जातात.
> प्लास्टिक बंदीच्या अधिसूचनेला महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅनिफॅक्‍चरर असोशियेशनचे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने २२ जून पर्यंत दंडाची अंमलबजावणी करु नये, असे आदेश दिले होते. आज न्यायालयात सुनावणी झाली. २० जुलै रोजी सुनावणी आहे.
> आॅक्टोबर २०१७ मध्ये पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात येईल असे जाहीर केले. १५ मार्चला राज्य मंत्रीमंडळाने बंदीचा निर्णय घेतला. २३ मार्च रोजी बंदी संदर्भात अधिसूचना जारी केली. ११ एप्रिल रोजी सुधारित अधिसूचना जारी केली. २२ जून पर्यंत दंड न करण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना.


एकाच वेळी दोन्हीही शिक्षा शक्य 
प्लास्टिक पिशव्या व थर्माकोलनिर्मित वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीवर बंदी आहे. ती मोडणाऱ्यांना पहिल्या वेळेस ५ हजार, दुसऱ्यांदा १० व तिसऱ्या वेळी २५ हजार रुपयांचा दंड किंवा ३ महिने कैदेची शिक्षा वा दोन्ही शिक्षा केल्या जातील. 


या प्लास्टिकवर पूर्ण बंदी 
प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या, नसलेल्या) थर्माकाॅल व प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोझेबल वस्तू. उदा. ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादी. हाॅटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी भांडी व वाट्या, स्ट्राॅ, नाॅन वोवन, पाॅलिप्राॅपीलेन बॅग्ज इत्यादी. द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप. थर्माकोल व प्लास्टिकचा वापर सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे. 


गौरी-गणपतीत थर्माकोल सूट? 
गणेश-गौरी महोत्सवापुरती थर्माकोल वापरास सूट देण्याच्या विनंत्या आहेत. गणेशोत्सव सजावटीची तयारी जानेवारीपासून सुरू होते. यामुळे मंडळांनी वापरलेले थर्माकोल नष्ट करण्यासाठी पालिकेकडे सुपूर्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दिल्यास विचार केला जाईल. 


रिटेल पॅकिंगच्या प्लास्टिकला मुभा 
रिटेल पॅकिंग प्लास्टिक यावर बंदी नाही. पुनर्वापर होईल असे प्लास्टिक वापरावे, याबाबत उत्पादकांशी चर्चा सुरू आहे. बेकरी उत्पादकांना प्लास्टिक पॅकिंगच्या बंदीसंदर्भात ३ महिने सूट दिली अाहे. त्यांनी पुनर्वापर होईल, अशा प्लास्टिक फिल्म वापरण्याच्या सूचना सरकारने दिल्या. 


उद्योगांचे नुकसान नाही : मंत्री कदम 
राज्यात दिवसाला प्लास्टिकचा १२ हजार टन कचरा निर्माण होतो. राज्यात येणाऱ्या ७०% प्लास्टिक पिशव्या गुजरातमधून येतात. महाराष्ट्रात केवळ ३०% उत्पादन होते. यामुळे राज्यातील उद्योगांचे नुकसान होणार नाही. 
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री 


या प्लास्टिकवर बंदी नाही 
पाण्याची बाटली औषधांचे वेष्टण कृषी क्षेत्रातील सामान साठवण्यासाठीचे प्लास्टिक नर्सरीमध्ये वापरात असलेले प्लास्टिक अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या रेनकोट कच्चा माल साठवण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक  टीव्ही, फ्रिजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे प्लास्टिक बिस्कीट, चिप्स, वेफर पुड्याची वेष्टणं हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाइन बॉटल्स, औषधांची आवरणं, प्लास्टिक पेन. 

 

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... नेमकी बंदी कशावर?

बातम्या आणखी आहेत...