आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे, शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे,  शरद पवार आणि जाॅर्ज फर्नांडिस. - Divya Marathi
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि जाॅर्ज फर्नांडिस.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला असला, तरीही सध्या भाजपविरोधी आघाडीचे राष्ट्रीय स्तरावर होत असलेले प्रयत्न पाहता या भेटीत राजकीय चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे पवारांना शिवाजी पार्कवर रविवारी होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे आमंत्रण देण्यास गेल्याचे समजते.   


रविवारी शिवाजी पार्कवर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज आपल्या पक्षाची पुढील दिशा काय असेल, याबाबत भाष्य करतील, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. या पार्श्वभूमीवर राज यांनी शनिवारी थेट पवारांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतल्याने मनसेच्या मेळाव्याबाबत उत्सुकता वाढली आहे. सुमारे चाळीस मिनिटे सुरू असलेली ही भेट पूर्वनियोजित असल्याचा खुलासा राज यांनी केला आहे. पुण्यातील प्रकट मुलाखतीनंतर शरद पवार यांच्याशी नीट बोलणे झाले नव्हते. त्यामुळे ते मुंबईत आले की भेटण्याचे ठरले होते. ही एक सर्वसाधारण भेट असून या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत राज यांनी पवारांना मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे आमंत्रण दिले आहे. 

 

पवारांनी लावली होती सेनेच्या दसरा मेळाव्यात हजेरी
 सध्याची राजकीय गणिते पाहता राज ठाकरे यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून पवार मनसेच्या मेळाव्याला हजर राहण्याची शक्यता अजिबात नसली, तरीही सत्तरच्या दशकात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला त्या वेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह पवार थेट या मेळाव्याच्या व्यासपीठावरच बसले होते. 

 

राज यांच्याकडून पवारांना निमंत्रण...

मनसेने सालाबादप्रमाणे यंदाही मराठी नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शिवाजी पार्क मैदानावर ‘पाडवा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. राज यांनी या पाडवा मेळाव्याचे शरद पवारांना निमंत्रण दिल्याचे समजते. शरद पवारांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

 

राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत ते काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

राज ठाकरे एप्रिल, मे मध्ये राज्यव्यापी दौर्‍यावर..

राज ठाकरे यांचा पक्ष मनसेच्या स्थापनेला नुकतीच 12 वर्षे पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने येत्या एप्रिल आणि मे महिन्यात राज्यव्यापी दौरा करणार आहे. राज यांनी सांगितले की, मनसेचे नेते आणि पदाधिकारी 21 मार्चपासून राज्यव्यापी दौर्‍याला सुरुवात करणार आहेत. जनतेशी संपर्क वाढवणे हा या दौर्‍यामागील उद्देश आहे.

 

दरम्यान, शिवाजी पार्कवर शिवसेना दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन करते.  त्याचप्रमाणे मनसेने गुढीपाडव्याच्या दिवशी मेळावा आयोजित करते.

बातम्या आणखी आहेत...