Home | Maharashtra | Mumbai | Sanatan Sanstha which member Vaibhav Raut is arrested by ATS

नालासोपारा देशी बॉम्बप्रकरणी 12 जणांना अटक; राज्यातील विविध जिल्ह्यात एटीएसची धरपकड सुरू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 11, 2018, 01:17 PM IST

मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर व नालासोपारा येथे घातपात घडवण्याचा मोठा कट एटीएसने उघडकीस आणला.

 • Sanatan Sanstha which member Vaibhav Raut is arrested by ATS

  मुंबई- नालासोपारा देशी बॉम्बप्रकरणी राज्यातील विविध जिल्हयांमध्ये एटीएसची धरपकड सुरू असून या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे, मुंबई, सातारा, पंढरपूर आणि नालासोपारा या परिसरातून सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे. या सर्वांची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर व नालासोपारा येथे घातपात घडवण्याचा मोठा कट एटीएसने उघडकीस आणला. गुरुवारी रात्री उशिरा एटीएसने सनातन संस्थेशी संबंधित वैभव राऊत (४०) याला नालासोपाऱ्यातून अटक केली. त्याच्याकडून स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला. शुक्रवारी मुंबई एटीएसने नालासोपारा व पुण्यातून आणखी दोघांना अटक केली. हे तिघेही सनातन संस्थेशी संबंधित असून ते एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय आहे. प्रारंभी आरोपींशी संबंध नाकारणाऱ्या सनातन संस्थेने शुक्रवारी सायंकाळपर्यंत आरोपी आपल्या संस्थेचा साधक असल्याचे कबूल करत बचावासाठी कायदेशीर मदतही देऊ केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.


  २० गावठी बॉम्बसह इतर साहित्य जप्त
  एटीएसने वैभव राऊतकडून २० गावठी बॉम्ब, २ जिलेटीनच्या कांड्या आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही जप्त केले. स्फोटकांचा हा साठा त्याने आपल्या घरी व स्वत:च्या मालकीच्या दुकानात लपवून ठेवला होता. त्याच्याकडून आणखी दोघांची नावे कळाल्यावर पोलिसांनी नालासाेपारा येथून शरद कळसकर (२५), पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर (३९) यांना अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने तिघांनाही १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गेल्या काही दिवसांपासून एटीएसचे पथक आरोपींच्या मागावर होते. राऊत व साथीदारांनी अज्ञात ठिकाणी बॉम्बनिर्मितीचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला.

  राऊतला सनातनची कायदेशीर मदत...

  सनातनशी संबंधित हिंदू विधिज्ञ परिषदेचे प्रवक्ते अॅड. संजीव पुनाळेकर व सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी राऊत हा सनातनचा साधक नसल्याचे सांगून तो हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनांत होता. यामुळे तो सनातनचाच आहे, असे आम्ही मानतो, असा खुलासाही यांनी केला.

  कोण आहे वैभव राऊत...?
  नालासोपारातील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता अशी वैभवची ओळख आहे. सूत्रांनुसार, १२-१५ वर्षांपूर्वी वैभव राऊत हा विश्व हिंदू परिषदेचे काम करत असे. अशात तो सनातन संस्थेतही सक्रिय झाला होता. सनातन संस्था तसेच हिंदू जनजागृती समितीच्या अनेक स्थानिक पातळीवरील कार्यक्रमातही तो सहभागी होत असे. नालासोपाऱ्यात गोरक्षेचेही काम त्याने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. नालासोपारा येथील भांडार आळीत त्याची चांगलीच दहशत आहे.


  दंगलीचाही आरोपी...

  हिंदू-मुस्लिम दंगलीतील गुन्ह्यांत वैभवला शिक्षाही झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगाबाहेर आला होता. त्याचे घर असलेल्या भांडार आळी परिसराजवळ वाजा मोहल्ला ही मुस्लिम वस्ती आहे. गेल्या ५-६ वर्षांत या २ वस्त्यांत अनेकदा वाद झाले. अनेकदा त्याचे पर्यवसान हाणामारीतही झाले आहे. अशा वादात वैभव नेहमीच अग्रभागी राहत असल्याची माहिती आहे.


  बकरी ईदला घातपाताचा कट होता : विखे पाटील
  बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडवण्याचा कट असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सनातनवर बंदीची मागणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सनातनला दहशतवादी संघटना घोषित करा, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही चौकशीची मागणी केली आहे.


  औरंगाबादेत हिंदुत्ववादी साधकांची चौकशी
  शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या सदस्यांची पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. शहरात काही साधकांवर गुप्तचरांची नजर असून दोन तरुणांचा शोध पोलिस घेत आहेत. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मुंबई एटीएसने पकडलेला वैभव शहरातील दोन तरुणांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय पथकाला आहे.

  हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट 2'
  वैभव राऊत यांना अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत. ते सनातन संस्थेचे साधक असल्याचेही बातम्यांमध्ये उल्लेख येत आहेत. वैभव राऊत हे एक धडाडीचे गोरक्षक असून ते ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणार्‍या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते. ते हिंदु जनजागृती समितीच्या सर्व हिंदु संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदु संघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असत; मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता, असे हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले आहे.

  हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे सिद्ध झाले आहे. वैभव राऊत यांची अटक ही 'मालेगाव पार्ट 2' आहे की काय, अशी शंका येत आहे, असेही सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

  नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात समोर आले होते नाव...

  पुण्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितेची अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव समोर आले होते.
  सीबीआयने याप्रकरणी वीरेंद्र सिंग तावडे याला जून 2016 अटक केली होती. वीरेंद्र सिंग हा हिंदु जनजागृती समितीशी संबंधित हेता. हिंदु जनजागृती समिती ही सनातन संस्थेचे ही एक शाखा आहे. सीबीआय याप्रकरणाची चौकशी करत आहे.

  पानसारे हत्याकांडातही होती सनातन संस्थेची भूमिका...
  महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते गोविंद पानसारे यांची हत्या 16 जानेवारी 2015 रोजी गोळी घालण्यात आली होती. नंतर उपचार सुरु असताना 20 जानेवारी 2015 रोजी मुंबईत पानसरे यांची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने सनातन संस्थेवर संशय व्यक्त केला होता. सनातनचा साधक समीर विष्णु गायकवाड याला अटक करण्‍यात आली होती. समीर गायकवाड हा सनातन संस्थेद्वारा प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे वितरण करत होता.

  कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्याकांडातही...
  कन्नड विद्यापीटाचे माजी कुलगुरु आणि हिंदू धर्मात फोफावलेल्या अंधश्रद्धेविरोधात रोखठोक लिखाण करणारे एमएम कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी गोळी घालून हत्या करण्‍यात आली होती. या प्रकरणात देखील सनातन संस्थेचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणेने म्हटले होते. नंतर 5 सप्टेंबरला 2016 ला पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्‍यात वाली होती. याप्रकरणी सनातन संस्थेशी संबंधित पाच संशयितांना अटक करण्‍यात आली होती. त्यापैकी चार आरोपींचा गोव्यात झालेल्या स्फोटात सहभाग होता. त्यांच्या विरोधात एनआयएने रेड कॉर्नर नोटिस बजावली होती.

  1999 मध्ये अस्तित्वात आली सनातन संस्था
  सनातन संस्था 1999 मध्य गोव्यात अस्तित्वात आली होती. या संस्थेचे मुख्यालय गोव्याची राजधानी पणजीपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या फोंडा येथे आहे. जयंत बालाजी आठवले यांनी सनातन संस्थेची पायाभरणी केली होती. भक्तराज महाराज यांच्या सहकार्यातून जयंत आठवले यांनी हिंदुंचा वैज्ञानिक दृष्टिकोण हा आध्यात्मिक बनविण्याच्या उद्देशाने सनातन संस्थेची स्थापना केली होती.

  जयंत बालाजी आठवले हे स्वत:ला हिप्नोथिरेपिस्ट अर्थात संमोहन कलेचे विशेषज्ज्ञ संबोधत होते. हळू हळू सनातन संस्थेने संपूर्ण देशभर आपल्या शाखा सुरु केल्या. हिंदी, मराठी, कन्नड़, गुजराती आणि इंग्रजीत जवळपास 65 लाख पुस्तके सनातन संस्थेने आतापर्यंत प्रकाशित केली आहेत. 'सनातन प्रभात' हे सनातन संस्थेचे मुखपत्र आहे. ते हिंदी, मराठी, कन्नड़, गुजराती आणि इंग्रजीत प्रकाशित केले जाते. याशिवाय संस्थेने 2008 मध्ये 'श्री शंकरा' हे टीव्ही चॅनल सुरु केले आहे. त्याद्वारे धर्मसत्संग व धर्मशिक्षणवर्ग असे दोन कार्यक्रम प्रसारित केले जातात.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 • Sanatan Sanstha which member Vaibhav Raut is arrested by ATS
 • Sanatan Sanstha which member Vaibhav Raut is arrested by ATS
 • Sanatan Sanstha which member Vaibhav Raut is arrested by ATS
 • Sanatan Sanstha which member Vaibhav Raut is arrested by ATS

Trending