आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदारकीचे आमिष; भाजप नेत्याला दहा काेटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आपल्या साथीदाराला मुख्यमंत्र्यांच्या आवाजाची नक्कल करावयास सांगून ठाण्यातील भाजपच्या नगरसेवकाकडून १० कोटी रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनुद शिरगावकर या महिलेस ठाणे पोलिसांनी अटक केली. तिच्याकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेची ४ बनावट ओळखपत्रेही आढळली. 


आपण व आपला सहकारी अनिल भानुशाली असे दोघेही मुख्यमंत्र्यांसोबत काम करत असून जुलैतील विधान परिषद निवडणुकीत आमदार म्हणून नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवत अनुदने घोडबंदर रोड परिसरातील भाजप नगरसेवक मनोहर डुंबरेंना १० कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. २५ लाखांचा पहिला हप्ता, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी ४ कोटी ७५ लाखांचा दुसरा व उर्वरित ५ कोटींचा शेवटचा हप्ता शपथविधीनंतर देण्याच्या अटीवर हा सौदा ठरला. डुंबरेंच्या बायोडेटाची एक प्रतही या जोडगोळीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी घेतली. त्यानंतर १९ मार्च रोजी अनुद हिने मनोहर डुंबरेंना फोन करून आपला बायोडेटा मुख्यमंत्र्यांनी अप्रूव्ह केला असून मुख्यमंत्र्यांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे आपले बोलणे करून देत असल्याचे सांगितले. या दूरध्वनी संभाषणादरम्यान अब्दुल्ला अन्सारी या अनुदच्या आणखी एका साथीदाराने मुख्यमंत्र्यांच्या आवाजाची नक्कल करत डुंबरेंना आमदारकीची हमी दिली. तसेच देण्याघेण्याबाबतचा व्यवहार अनुद शिरगावकरसोबत करावा अशी सूचना केली. मात्र हा एकूणच प्रकार संशयास्पद वाटल्याने डुंबरे यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधत तक्रार नोंदवली.  पोलिसांनी सापळा रचत २० मार्च रोजी अनुद शिरगावकर हिला ठाण्यातील कासारवडवली परिसरातील हॉटेल तुलसीमध्ये डुंबरे यांच्याकडून २५ लाख रुपये घेताना अटक केली. अनुदच्या अटकेनंतर लगेचच पोलिसांनी तिचा साथीदार  अनिल भानुशाली यालाही  नवी मुंबईतील घणसोली इथून ताब्यात घेतले. भानुशाली याच्याकडून केंद्रीय दक्षता आयोगाचे त्याच्या नावचे प्रमाणपत्र सापडल्याची माहिती सहायक आयुक्त मुकुंद हातोटे यांनी दिली. 

 

मुख्यमंत्र्यांची बनावट सही असलेली कागदपत्रे
अाराेपी अनुद शिरगावकर हिच्याजवळ मुख्यमंत्र्यांची बनावट सही असलेली डुंबरे यांच्या बायोडेटाची प्रत आणि एनआयएची कर्मचारी असल्याबाबतची चार बनावट ओळखपत्रेही सापडली. या जोडगोळीने अजून काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहितीही हातोटे यांनी दिली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... विधानसभेत 'भागमभाग', मेस्मा कायदा रद्दच्या मागणीवरुन शिवसेना आमदाराने राजदंड पळवला