आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदार दराडेंची पहिल्याच दिवशी ‘शिकवणी’; नीलम गोऱ्हेंनी भरसभागृहात झापले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेचे नवनियुक्त सदस्य नरेंद्र दराडे यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार झटका बसला. सभागृहात ते विलंबाने आले, त्यात चुकीच्या दाराने प्रवेश केला. सभापती व सदस्य यांच्यातून भाषणादरम्यान ते चालत गेले. त्याबद्दल त्यांच्याच पक्षाच्या प्रतोद डाॅ. नीलम गोऱ्हे यांची दराडे यांना भर सभागृहात बोलणी खावी लागली.   


वरिष्ठ सभागृहात कामकाजाला प्रारंभ होताच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर दिवंगत सदस्य पांडुरंग फुंडकर यांच्यावरील शोकप्रस्तावावर सदस्य बोलत होते. शिवसेनेच्या सदस्य डाॅ. नीलम गोऱ्हे या शोकप्रस्तावावर बोलत होत्या. त्या बोलत असताना शिवसेनेचे नवनियुक्त सदस्य नरेंद्र दराडे सभागृहात प्रवेशले. दराडेंना येण्यास विलंब झाला होता. त्यांची बसण्याची जागा चौथ्या दाराच्या जवळ होती. पण, गडबडीत ते मुख्यमंत्री येतात त्या पहिल्या दारातून आत आले.  त्यांना दिलेल्या आसनाकडे जाण्यासाठी त्यांना सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेतून चालत जावे लागले. दराडे मध्ये आल्याने नीलम गोऱ्हे बोलायच्या थांबल्या. दराडे बाजूला झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘दराडे, तुम्ही असे मध्ये यायला नको होते. इकडे या.. तुमची बसायची जागा इथे आहे.’ नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे गोऱ्हे यांनी दराडे यांना रागावणे साहजिक होते.  


सर्वात शेवटी दराडेंचा परिचय  
सभागृहाच्या प्रारंभी पाच सदस्यांचा परिचय झाला होता. दराडे विलंबाने आले. त्यामुळे विधेयके, पुरवणी मागण्या, शोकप्रस्ताव, तालिका सभापतींचे नामनिर्देशन, अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर झाल्या. सभागृह संपताना दराडे यांचा परिचय करून देण्यात आला. दराडे यांचा परिचय झाल्यानंतर सर्व सदस्य दराडे यांना ‘आता बसा..’असे एकसुरात म्हणाले.  


नियम नेमका काय आहे?  
सभागृहामध्ये कोणताही सदस्य बोलत असताना सभापती आणि बोलणारा सदस्य यांच्यामधून कोणी जायचे नसते, अशी सभागृहाची प्रथा आहे. चुकून कुणी सदस्य मध्ये आलाच तर बोलणाऱ्या सदस्याने त्यांचे भाषण थांबवायचे असते. चुकून आलेला सदस्य बाजूला झाल्यानंतरच मग ते भाषण सुरू करायचे असते.


पहिलाच दिवस असल्याने माझा गोंधळ झाला 
‘मी येवला येथून मोटारीने आलो. नागपुरात मी साडेबाराला पोहोचलो. त्यामुळे मी गडबडीतच विधिमंडळात आलो. माझा आज सभागृहातील पहिलाच दिवस होता. परिणामी हा सर्व गोंधळ झाला,’ अशी माहिती नरेंद्र दराडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितली.

 

बातम्या आणखी आहेत...