आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये नेता येतील बाहेरील खाद्यपदार्थ! प्रेक्षकांना रोखल्यास कठोर कारवाईचे निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सरकारने शुक्रवारी खुशखबर दिली. येत्या १ ऑगस्टपासून प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील. त्यासाठी कुणीही मज्जाव करू शकत नाही. कोणी रोखल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. चित्रपटगृहाबाहेर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दरही घटवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. 


मल्टिप्लेक्सच्या खाद्यपदार्थांच्या किमतींबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले. मल्टिप्लेक्समधील महागाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.  याबाबत मुंबई हायकोर्टाने नुकतेच सरकारला निर्देश दिले होते. हायकोर्टातील सुनावणीदरम्यान फिक्की मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनने म्हटले होते की, या प्रकरणी बाजू मांडण्याची परवानगी दिली जावी. 


खाद्यपदार्थ एमआरपीवरच विकण्याची सक्ती
राज्यमंत्री म्हणाले, सर्व मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किमती समान ठेवल्या जातील. जागा बदलली म्हणून वस्तूची ‘एमआरपी’ बदलू शकत नाही. एकाच वस्तूची किंमत २ वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकत नाही. १ ऑगस्टपासून यासंबंधीच्या केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी होईल. तसेच, खाद्यपदार्थांच्या किमतींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अधिवेशनानंतर सभापतींच्या दालनात बैठक घेतली जाईल.

 

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या  
संजय दत्त आणि नीलम गोऱ्हे यांनी या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत बोलताना मल्टिप्लेक्समध्ये कर्मचाऱ्यांकडून अरेरावी करण्यात येते हा मुद्दा उपस्थित केला तर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी मल्टिप्लेक्समध्ये महागड्या वस्तू विक्रीविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी केली. अनेक सदस्यांचे यासंदर्भातले प्रश्न लक्षात घेऊन चालू अधिवेशन संपल्यानंतर संबंधित सदस्यांची बैठक घेण्याचे आदेश उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी या वेळी दिले.

 

पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना..

पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का विकता, असा सवाल हायकोर्टाने केल्यानंतर मनसेने मल्टिप्लेक्सविरुद्ध राज्यभर आंदोलन सुरू केले होते. त्याविरुद्ध कोर्टाने दावा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने अखेर मल्टिप्लेक्स चालकांना राजदरबारी धाव घ्यावी लागली होती. गेल्या आठवड्यात सर्व मल्टिप्लेक्स सीईओंनी राज यांची भेट घेतली. चहा-कॉफी, वडा, समोसा, पॉपकॉर्नचे दर 50 रुपयांपर्यंत कमी करावेत. चहा, कॉफी, पाणी बॉटल, समोसा, पॉपकॉर्न व वडा यांचे दर माफक असावेत. बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावेत यावर आक्षेप नाही. लहान मुलांचे अन्न, मधुमेही व हृदयरोगींना बाहेरील अन्नपदार्थ आणण्याची परवानगी मिळावी, या मनसेच्या मागण्या मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत.

 

राज ठाकरे यांनी यावर घेतला होता आक्षेप
- चित्रपटगृहात खाद्यपदार्थांचे दर अवाजवी, प्रेक्षकांना विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार घडतात.
- कर्मचारी वर्ग प्रेक्षकांशी उर्मटपणे वागतो अशा अनेक तक्रारीही आल्या.
- मध्यंतराचा कालावधी इतका छोटा असतो की झालेली फसवणूक प्रेक्षकाला चित्रपटगृह सोडल्यावर लक्षात येते. तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो.
- सिनेगृहात राष्ट्रगीतानंतर पडद्यावर यासंबंधीची तक्रार कुठे करावी याचा तपशील दाखवावा.

बातम्या आणखी आहेत...