आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्याने अाता राष्ट्रवादीच्या राज्यातील नेतृत्वबदल होणे निश्चित झाले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेतील गटनेते व पक्षाध्यक्ष शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील यांचे नाव निश्चित मानले जाते. सुप्रिया सुळे यांनीच त्यास अनुकूलता दर्शवल्याने पाटील यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते. २९ एप्रिलला पुण्यात होणाऱ्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता आपण या पदावरून पायउतार होऊ इच्छित असल्याची भावना पक्षनेतृत्वाला कळवल्याची माहिती खुद्द सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर विरोधी बाकांवर असताना नव्याने पक्षबांधणीची संधी आपल्याला यानिमित्ताने मिळाली. शिवाय या चार वर्षांच्या कार्यकाळात चार वेळा राज्याचा दौरा करता आला. तसेच आपल्या कार्यकाळात सरकारच्या विरोधातील हल्लाबोल यात्रेचे यशस्वी नियोजन केले. आता या पदावर नव्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. येत्या २९ एप्रिल रोजी पुण्यात पक्षाची विस्तारित कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी होणाऱ्या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रात अाव्हान चंद्रकांत पाटलांचे
जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यालाच प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार असल्याचे समजते. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही २०१९ साठी जोरदार तयारी सुरू केल्याने नव्या प्रदेशाध्यक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे.
जयंत पाटीलच का?
प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेतून सुनील तटकरे बाहेर पडल्याने आता जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. विरोधी बाकावरील अभ्यासू आमदार अशी जयंत पाटील यांची अाेळख अाहे. आपल्या अनोख्या भाषणशैलीद्वारे सरकारची काेंडी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय राजकीय वादापासून कायम दूर राहणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक वाचा...बालेकिल्ल्यात पुनरागमनाचे मोठे आव्हान
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.