आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • प्लास्टिक बंद: ठाण्यात कठोर कारवाई, अडीच हजार किलो प्लास्टिक जप्त; 95 हजारांचा दंड वसूल Thane Municipal Corporation Action On Plastic Users

प्लास्टिक बंद: ठाण्यात कठोर कारवाई, अडीच हजार किलो प्लास्टिक जप्त; 95 हजारांचा दंड वसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य शासनाने प्लास्टिक वस्तुंच्या वापरावर घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने आज (शनिवार) ठाणे महानगरपालिकेने धडक कारवाई करत तब्बल अडीच टन वजनाच्या बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू जप्त केल्या. तर नागरिकांकडून अंदाजे 95 हजार रूपयांचा दंडही वसूल केला.

 

एकीकडे ठाणे महापालिकेने धडाक्यात कारवाई सुरू केलेली असताना मुंबई महापालिकेने मात्र सोमवारपासून कारवाईला सुरूवात करण्याचे नियोजन केले आहे. तसेच मुंबई महापालिका प्रशासनातर्फे शनिवारी एक जनजागृती रॅली काढून प्लास्टीक बंदीचे आवाहन केले.  

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने 23 जूनपासून प्लास्टिकच्या वस्तु आणि थर्माकोलच्या वापराविरोधात कारवाई करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध महापालिकांनी प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईला सुरूवात केली. ठाणे महापालिकेने सर्व प्रभाग स्तरावर सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक यांच्या देखरेखीखाली कारवाईला सुरूवात केली. या कारवाईमध्ये 100 पेक्षा अधिक दुकानदार व विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या व्हाटस्अॅप क्रमांकावर प्लास्टीक वापराबाबत जवळपास 75 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महापालिकेच्या कारवाईमध्ये जमा झालेले जवळपास अडीच टन प्लास्टिकवर महापालिकेच्या सुका कचरा संकलन केंद्राच्या माध्यमातून नियमानुसार पुनर्चक्रीकरण करण्यात येणार आहे.

 

मुंबई महापालिकेने मात्र सोमवारपासून कारवाईचे नियोजन केल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांनी सांगितले. शनिवारी महापालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडिया अशी रॅली काढून जनजागृती केल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेने कारवाईसाठी 250 निरिक्षकांचे एक विशेष पथक तयार केले असून त्यांना विशिष्ट गणवेशही देण्यात आला आहे. शहरात 38 ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टीक वस्तुंची संकलन केंद्रे उभारण्यात आली असून रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यानंतर बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तु आढळल्यास कारवाई करणार असल्याचे खबाले म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...