आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज आपण महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या पगडीचे राजकारण करत आहोत. मात्र, पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता केला आहे.

 

आचार्य अत्रे पुरस्कार सोहळ्यात उद्धव ठाकरे सोमवारी बोलत होते. तसेच देशात छुप्या पावलांनी आणीबाणी प्रवेश करत आहे, असे सांगत भाजपवरही टीका केली.  

 

शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पुणे येथील एका कार्यक्रमात पुण्यात आलो की पुणेरी पगडी नको फुले पगडी घालून स्वागत करा, असा आदेश त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर पगडीवरून शरसंधान केले. उद्धव म्हणाले, पत्रकार म्हटले की लोकमान्य टिळक, आगरकर यांचा उल्लेख येणारच. लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांचे कार्य प्रचंड आहे. मात्र,  आपण ते विसरतो आणि त्यांच्या पगड्या घालून महात्मा होण्याचा प्रयत्न करतो. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना विचारले होते सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हाच प्रश्न पगडी घालून मिरवणाऱ्यांना आणि त्याचे राजकारण करणाऱ्यांना विचारला पाहिजे, ठिकाणावर सोडून द्या, डोके आहे का? असा प्रश्न करत हिंमत असेल तर टिळक, महात्मा फुले यांच्या कर्तृत्वाची उंची गाठून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले. 

 

जुमलेबाजीने देशाचा घात केला
लोकमान्य टिळक यांनी, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे म्हटले होते. मात्र, आज हा विचार करण्याची आवश्यकता आहे की, लोकमान्य टिळकांना जे स्वराज्य अपेक्षित होते ते स्वराज्य आले आहे का? देशात दुसरी आणीबाणी आली, अशी कुजबूज होताना दिसते आहे. जुमलेबाजीने देशाचा घात केला आहे. सध्या देशात छुप्या पावलांनी आणीबाणी प्रवेश करत आहे, परंतु आम्ही इंग्रजांची आणि इंदिरा गांधींची गुलामगिरी उखडून फेकून दिली. आतादेखील असा प्रयत्न झाल्यास जनता तेच करेल, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

बातम्या आणखी आहेत...