आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रेल्वे सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या शेकडो प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी काल (मंगळवार) मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर नियोजनबद्ध पद्धतीने रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून राज्य सरकारला टार्गेट केले आहे. ‘स्किल इंडिया’च्या नावाखाली सरकार ‘थापा’ मारत असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.
उद्धव यांनी म्हटले की, नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारखे लोक देशाची लूट करून पळून जातात. मात्र, भूमिपुत्राला रोजगारासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागत आहे. 'स्किल' कमावलेली रेल्वेची पोरं बेकार बसली असून 'थापा' मारण्याचे स्किल राज्य सरकारने कमावले आहे.
बुलेट ट्रेन, हाय स्पीड ट्रेनच्या घोषणा श्रीमंतांसाठी आहेत. मुंबईच्या रेल्वे मार्गावर उतरून आंदोलन करणारी मुले गरीबांची आहेत. एल्फिन्स्टनचा पूल लष्कराने बांधला तसे या मुलांचे प्रश्न लष्करच सोडवणार व तुम्ही सगळे आढय़ास तंगडय़ा लावून बसणार, अशी काही योजना आहे काय?
नेमके काय आहे अग्रलेखात..
लष्कराच्या मदतीने सरकारने एल्फिन्स्टनचा पूल बांधला हे चांगले झाले. त्या पूल बांधणीचे श्रेय भाजपने घेऊन राजकारण केले. हेसुद्धा त्यांच्या नैसर्गिक स्वभावधर्मास धरून आहे. पण त्याच रेल्वेतील भरती गोंधळाविरोधात हजारो विद्यार्थी मंगळवारी सकाळी रेल्वे फलाटांवर घुसले. दादर-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान त्यांनी आंदोलन केले. लोकल गाडय़ा अडवून ठेवल्या. सकाळी मुंबईकर कामधंद्यास निघतो. लोकल ही त्यांची जीवनवाहिनी आहे. तीच थांबल्यावर जो गोंधळ होतो त्यामुळे संपूर्ण मुंबई विकलांग होते. मंगळवारी सकाळी हे घडले आहे. ज्यांनी एल्फिन्स्टन पुलाचे लष्करी श्रेय घेऊन पानभर जाहिराती केल्या ते सर्व लोक कालच्या गोंधळाचेही श्रेय घेतील काय? रेल्वे भरतीत मोठा गोंधळ झाला आहे, असे आमचे म्हणणे नाही. रेल्वे ऍप्रेंटिस म्हणून ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना रेल्वेने नोकरीत सामावून घ्यायला नकार दिला. मग प्रशिक्षणाचा फायदा काय? या रेल्वे ऍप्रेंटिस मुलांनी रेल्वे मंत्र्यांच्या घराचे उंबरठे झिजवले. पण रेल्वेमंत्री त्यांचे ऐकायला तयार नाहीत. एका बाजूला ‘स्किल इंडिया’सारख्या विषयांना चालना देण्याची भाषा पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’मधून करायची. त्या
‘मन की बात’च्या जाहिरातींसाठी
सरकारी तिजोरीतून दहा-वीस कोटींचा खुर्दा उडवायचा. पण ज्यांनी असे ‘स्किल’ मिळवले त्यांना बेरोजगार करायचे. अशी ही बनवाबनवी सर्वच पातळय़ांवर सुरू आहे. प्रत्येक वर्षी किमान एक कोटी लोकांना रोजगार देऊ असे पंतप्रधानांनी सांगितले होते. पण हजार लोकांनाही रोजगार मिळाला नाही. उलट ज्यांचा रोजगार होता त्यांचा रोजगार गेला व चुली विझल्या. ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ची गाडी बिनचाकांची होती व रेल्वेचे ऍप्रेंटिस त्याच संतापाने रस्त्यावर उतरले. या आंदोलनासाठी देशभरातून रेल्वे ऍप्रेंटिस आले. आम्ही अशा प्रकारचे आंदोलन करीत आहोत अशी सूचना देऊनही रेल्वे प्रशासन त्यांच्या दुःखाची दखल घ्यायला तयार नव्हते. काही महिन्यांपूर्वी हे विद्यार्थी दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनाही भेटले. पण या गरीब मुलांचे कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. मुलांना ऍप्रेंटिस म्हणून राबवायचे व नंतर हाकलून द्यायचे. एक प्रमाणपत्र हातात देऊन बाहेर काढायचे. हेच तुमचे ‘स्किल इंडिया’ आहे काय? ‘स्किल इंडिया’ नावाचा भ्रमाचा भोपळा अशाप्रकारे फुटला आहे. गेल्या चार वर्षांत किती लोकांना ‘स्किल इंडिया’खाली तरबेज केले व रोजगार दिलात याची काही आकडेवारी सरकारकडे असेल असे वाटत नाही.
‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’
त्यातलाच हा प्रकार. हाताला काम नाही व मालास दाम नाही. पण दाम करी काम हा प्रकार मात्र जोरात सुरू आहे. बेरोजगारी हटवण्याचा नामी उपाय सरकारने शोधला तो म्हणजे नोकर भरती करायची नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तेच झाले. स्पर्धा परीक्षांची भरती बंद केल्याने हे विद्यार्थीही मोठय़ा प्रमाणात मुंबई-पुण्यात रस्त्यांवर उतरले. आता रेल्वेची पोरे उतरली. शेतकरी मुंबईत हल्लाबोल करून गेलाच आहे. हे असे आणखी किती काळ रेटणार आहेत? नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारखे लोक देशाची लूट करून पळून जातात व भूमिपुत्र मात्र रोजगारासाठी रस्त्यावर संघर्ष करतोय. ही फसवणूक आहे. ‘स्किल’ कमावलेली रेल्वेची पोरे बेकार बसली असली तरी ‘थापा’ मारून राज्य करण्याचे स्किल सरकारने कमावले आहे. गोरखपूर-फुलपूरच्या पराभवानंतर योगी सरकारने नव्या चार लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. पण ज्या रेल्वे ऍप्रेंटिसचे आंदोलन मुंबईत सुरू आहे त्यात उत्तर प्रदेश, पंजाबचीही मुले आहेत. बुलेट ट्रेन, हाय स्पीड ट्रेनच्या घोषणा श्रीमंतांसाठी आहेत. मुंबईच्या रेल्वे मार्गावर उतरून आंदोलन करणारी मुले गरीबांची आहेत. एल्फिन्स्टनचा पूल लष्कराने बांधला तसे या मुलांचे प्रश्न लष्करच सोडवणार व तुम्ही सगळे आढय़ास तंगडय़ा लावून बसणार, अशी काही योजना आहे काय?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.