आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मागील आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तोच धागा धरून विखे पाटील विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणात धमाल उडवून दिली.
पाटील म्हणाले की, मंत्रालयातील उंदरांना मारण्यासाठीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेचा मागील आठवड्यात एकनाथ खडसे यांनी पर्दाफाश केला होता. सरकारचे ते उंदीर निर्मूलनाचे टेंडर फसले असले तरी मी आज मी सरकारसमोर एक नवे टेंडर सादर करतो. या टेंडरचा गांभीर्यांने विचार करून ते लवकरात लवकर स्वीकृत केले पाहिजे.
एकनाथ खडसे मंत्रालयात मारल्या गेलेल्या 3 लाख 19 हजार 400.57 उंदरांबाबत बोलले. माझे नवीन टेंडर राज्यात आजही हैदोस घालणाऱ्या आणि अजूनही मारायचे शिल्लक असलेल्या उंदरांबाबत आहेत. मेलेल्या 3 लाख 19 हजार 400.57 उंदरांव्यतिरिक्त आजही अनेक उंदीर मंत्रालयात हैदोस घालीत आहेत. तर काहींचा महापालिकेत सुळसुळाट झाला आहे. या उंदरांमध्ये काही सुष्ट आहेत, काही पुष्ट आहेत, तर काही दुष्ट आहेत.
काही उंदीर बेडकीसारखे फुगून मस्तवाल झाले आहेत. तर काही अगदीच कृश आहेत. काही उंदीर हे इतर मस्तवाल उंदराकडे पाहून नुकतेच जन्माला आले आहेत. तर काही उंदीर उंदरींच्या उदरातून जन्म घेऊ पाहत आहेत. अशा उंदरांचे निर्मूलन करण्यासाठीचे हे टेंडर आहे. आधी आपण मंत्रालयातील उंदरांच्या निर्मूलनाविषयी जाणून घेऊ. काही उंदीर हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निधी कुरतडत आहेत. यातले काही उंदीर अन्न व नागरी पुरवठा विभागातही आहेत. तिथे ते जनतेच्या धान्यावर तूर, तांदूळ, गहू, सोयाबीन, कापसावर ताव मारीत आहेत.
मूषक हे वाहन असलेल्या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना वाजतगाजत पुण्यात होत असली, आणि तो बहुमान सर्वप्रथम पुण्याचा असला तरी पुण्यातील काही उंदीर बुद्धीमान आहेत आणि बेरकीही आहेत. या उंदरांना पकडायला गेले की, ते लगेच पुणेरी पगडीखाली लपून बसतात. इथल्या उंदरांचा धोका पेशवाईत 'नाना फडणवीसां'नाही झाला होता. हा धोका ओळखून आजच्या 'फडणवीस' सरकारने तातडीने या चतूर उंदरांना जेरीस आणण्याची गरज आहे. काही उंदीर कुपोषित बालकांचा पोषण आहार फस्त करतात. तर काही उंदीर आदिवासी मुलांसाठीचे स्वेटर आणि रेनकोटही कुडतरतात.
यातील काही उंदीर हे नुकतेच जन्माला आलेले आहेत. मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यासारख्या नव्या व डोळे दिपवणाऱ्या कार्यक्रमांमध्येही ते घुसले आहेत. हे उंदीर कुरतडत काहीच नाहीत. हे छुपे उंदिर आहेत. यांचे काम छुप्या पद्धतीने चालते. हे गणपतीपुढील प्रसाद तेवढा गुपचूप पळवतात आणि जनतेला दाखविलेली मोठमोठी स्वप्ने खाऊन फस्त करतात. या उंदरांनी 'मेक इन महाराष्ट्र' च्या सिंहालाही आता पुरते झोपवून टाकले आहे. जे 0.57 इतके उंदिर आहेत, जे आजही उंदरीच्या पोटात आहेत आणि जन्म घेऊ पाहत आहेत. हे सारे मंत्रालयातील 'खासगी उंदीर' आहेत. या खासगी उंदरांचा धोका राज्याला फार मोठा आहे. सरकारी उंदीर पकडता तरी येतात. मात्र हे खाजगी उंदीर काही केल्या हाती लागत नाहीत.
काही उंदरांनी पकडले जाण्याच्या भीतीने जलयुक्त शिवारच्या जलसाठ्यात उडया घेतल्यात. आता या जलयुक्त शिवारच्या जलसाठ्याला मेलेल्या उंदरांचा येणारा कुबट वास असह्य झाला आहे. काही उंदीर चंद्रकांत पाटील यांच्या 'खड्डेमुक्त महाराष्ट्रा'च्या खड्यात दडून बसले आहेत.
या सर्व उंदरांना मारण्यासाठी राज्यात काही मांजरीही सोडल्या आहेत. या मांजरी 'विशेष' आहेत. कारण पूर्वी उंदीर असलेल्यांचे काहींचे रूपांतर आता मांजरीत झाले आहे. या मांजरी अनोख्या आहेत. त्यांनी वाघाचं केवळ कातडे पांघरले आहे. या मांजरींची दोस्ती फक्त 'पेंग्विन'शी आहे.
हे उंदिर 'नाईट लाईफ' वर फिदा असल्याने फक्त रात्रीच हैदोस घालतात. रुफ टॉप, कमला मिल, मिठी नदीचा मलिदा खाऊन या उंदरांचे आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रूपांतर झाले आहे. ही वाघाची मावशी आहे, वाघ नव्हे!
ही वाघाची मावशी उंदरांना भीती वाटावी म्हणून अधूनमधून 'म्याँव म्याँव' करीत फुत्कारत येते आणि सोडून जाण्याच्या धमक्या देते. पण दुधाची वाटी दाखवली की, पुन्हा गप्प होते आणि बिळात जाऊन बसते. आता हे मांजरीचे बीळ कुठे आहे, त्याचा पत्ता मी सांगण्याची गरज नाही. ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.
यातील काही उंदिर आता वृद्ध झाले आहेत. कुरतडण्याच्या कामातून निवृत्त झाले असले तरी राजकीय पाठबळ असल्याने ते पुन्हा पुन्हा हैदोस घालतच आहेत. त्यातला एक उंदीर 'समृद्धीमहामार्गा'वर फिरतो आहे. तर दुसरा 'मुंबई महापालिके' वर आहे. काही उंदरांना तर, पोलिसांचाही धाक उरलेला नाही. या उंदरांनी पोलिसांची रक्षा जाकिटेही कुरतडली आहेत.
काही उंदिर गुंड प्रवृत्तीचे आहेत. जे भरदिवसा कट्टे, गुप्ती, विदेशी बनावटीच्या बंदुका खुलेआम बाळगतात. यातील काही उंदीर सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांच्या यवतमाळमध्ये हैदोस घालत आहेत. तर काही संत्रानगरी नागपुरात आहेत. या उंदरांचा ठावठिकाणा जाहीर करूनही ते पोलीस यंत्रणेच्या हाती लागत नाहीत, हे आश्चर्य आहे.
हे 'मूषक आख्यान' फार मोठे आहे. वेळेअभावी मी इतकेच सांगेन की, आपण उंदीर हे श्रीगणेशाचे वाहन मानतो. 2014 मध्ये सत्तारुपी गणेशाची प्रतिष्ठापना सरकारने केली. पण त्यानंतर गणपतीचे वाहन होण्याचे सोडून काही उंदरांनी पळ काढला आणि एकाचे अनेक अशा असंख्य उंदरांचा सुळसुळाट राज्यात गेले 4 वर्षे सुरू आहे.
या उंदरांवर 'कडी नजर' ठेऊन, सरकारचे उंदरांच्या निर्मूलनातील अपयश वेळोवेळी दाखवून द्यायला सत्तेतीलच काही 'बोकेही' तयार झाले आहेत. वेळीच या उंदरांचे निर्मूलन केले नाही तर, या बोक्यांची संख्याही वाढत जाईल. या उंदरांनी गेले 4 वर्षे जो उच्छाद मांडला आहे, तेच उंदीर राज्य तर पोखरतीलच, पण 2019 ला सरकारची मते कुरतडल्याशिवाय आणि सिंहासन पोखरल्याशिवाय राहणार नाहीत.
तरी 3 लाख 19 हजार 400.57 या मारलेल्या उंदरांव्यतिरिक्त राज्यात आता उच्छाद घालत असलेल्या या असंख्य उंदरांच्या निर्मूलनाचे हे नवे टेंडर मुख्यमंत्र्यांनी त्वरीत मंजूर करावे. नाहीतर सरकारनेच पोसलेले, वाढवलेले हे उंदीर, मांजरी, बोके सरकारसकट राज्यालाच संपवून टाकतील.
तसे झाले नाही तर 2019 मध्ये या उंदरांना समूळ नष्ट करायला आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसह सज्ज आहोत, असा सूचक इशारा देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मूषक आख्यानाचा समारोप केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.