आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई/पुणे- कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या संशयीतांकडून जप्त केलेल्या डायरीत पुढील लक्ष्य म्हणून अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमिद आणि मुलगी मुक्ता दाभोलकर, तसेच कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा यांच्या नावाची नोंद आढळून आली होती. याबाबतची माहिती कर्नाटक पोलीसांनी दोन महिन्यांपुर्वीच महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबियांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाद्वारे या दोन्ही कुटुंबियांमधील सदस्यांसोबत २४ तास स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा सशस्त्र जवान तैनात करण्यात आला आहे.
अंनिसच्या 'जबाब दो' आंदोलनाची तीव्रता वाढवणार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑ'गस्ट रोजी पाच वर्षे तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येलाही साडेतीन वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटक सरकारने गौरी लंकेश हत्येच्या तपासात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. मात्र, महाराष्ट्र शासन आणि सीबीआय फारशी प्रगती करू शकली नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 'जबाब दो' आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे. हे आंदोलन 20 जुलैपासून सुरू असून त्याची तीव्रता 20 ऑगस्टपासून देशभर वाढवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरांच्या सोबत जिल्ह्यातही हे आंदोलन केले जाणार आहे. पुण्यातील कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज, अमोल पालेकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे उपस्थित राहणार आहेत. या वेळी डॉ. दाभोलकरांच्या "भ्रम आणि निराशा' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, तर राष्ट्र सेवादल इचलकरंजीचे स्मिता पाटील कला पथक "गांधीजींचे काय करायचे' हे नाटक सादर करणार आहेत. दिल्ली, केरळ, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांतही आंदोलन केले जाणार आहे.
...त्या संस्थेविषयी सरकारने भूमिका जाहीर करावी
डॉ. दाभोलकर, डॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही गुन्ह्यांत सारखेच पिस्तूल वापरले असल्याचा पुरावा समोर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गौरी लंकेशप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची दाभोलकर आणि पानसरे खुनाच्या प्रकरणीही तपासणी व्हावी. या चारही खुनांच्या घटनेतील मारेकरी एकाच संस्थेशी संबंधित असल्याचे समोर येत असल्याने या संस्थेविषयी भूमिका सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.