आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराज एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरोखरच प्रवेश की भाजपावर दबावाची खेळी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. - Divya Marathi
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या भाजपमध्ये नाराज आहेत. मात्र, खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, खडसेंनी याबाबत मौन पाळणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे तर, भाजपने याचे खंडन केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी राष्ट्रवादीने उठवलेली ही आवई असून त्यांची ही जुनी खोड असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भाजपात फार भविष्य दिसत नसल्याने व मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने डावलले असल्याने खडसे राष्ट्रवादीत खरोखरचं जाणार की पक्षांतर्गत दबाव टाकत आहेत हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

 

एकनाथ खडसे हे भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, 2014 साली भाजप सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना बसविले. त्यामुळे खडसे नाराज झाले. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातील सर्वात महत्त्वाचे महसूल खाते देत क्रमांक दोनचे स्थान दिले. मात्र, त्यानंतरही खडसे मुख्यमंत्र्यांना शह देत राहिले. अखेर खडसेंची काही प्रकरणे बाहेर काढण्यात आली. जून 2016 मध्ये त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आठ-दहा खात्यांचा राजीनामा द्यावा लागला.

 

भोसरी जमिन प्रकरणाची चौकशी लावली मात्र, त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली झोटिंग समिती व तिचा अहवाल निरर्थक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच हिवाळी अधिवेशनात नागपूरात सांगितले. त्यामुळे खडसेंच्या बाबतीत भाजप बिलकूल मवाळ नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. एकीकडे खडसेंना डावलले जात आहे तर काँग्रेसमधून एनडीएत सामील झालेल्या नारायण राणेंना मानाचे पान देण्याची तयारी सुरू आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर खडसे अस्वस्थ आहेत. त्यांनी याबाबतची आपली भूमिका, नाराजी नुकतीच वृत्तवाहिन्यांवर प्रगट केली आहे. त्यामुळे खडसे भाजपवर नाराज आहेत हे स्पष्ट आहे. मात्र, पक्ष सोडण्याबाबत ते कितपत विचार करतील याबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल.

 

जळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या एकसष्ठी निमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवारांसह खडसेंनी व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी खडसे-पवारांनी याबाबत भाष्य केले. भाजप, सेनेत गेलेले अनेक कार्यकर्ते घरवापसी करणार आहेत, अनेक जण आमच्या पक्षनेतृत्त्वाशी चर्चा करत आहेत, असे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच राजकारणात कोणीच कोणाचं कायमचे शत्रू आणि मित्र नसते असे सांगत खडसेंच्या प्रवेशाचे संकेत दिले.

 

सत्तेत घेण्यासाठी खडसेंचा पक्षनेतृत्त्वावर दबाव-

 

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. महिन्याभरात तो विषय मार्गी लागेल असे बोलले जात आहे. यात भाजप अंतर्गत फेरबदलाचे संकेत आहेत. खराब कामगिरी करणा-यांना डच्चू मिळू शकतो तर काही फ्रेश चेह-यांना संधी दिली जाऊ शकते. नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेतले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना आपलेही पक्षाने पुनर्वसन करावे अशी इच्छा आहे. मात्र, फडणवीस यांनी त्यांच्याबाबतचा निर्णय न्यायालयावर सोपवून आपली सुटका करून घेतली आहे. त्यामुळेच कमालीचे अस्वस्थ असलेले खडसे खरोखरच 40 वर्षापासूनचा भाजप पक्ष सोडणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

 

मात्र, काहींच्या म्हणण्यानुसार, खडसे असे करून पक्षाला इशारा देत आहेत की, मला मंत्रिमंडळात घ्या अन्यथा मी इतर पक्षात जाऊ शकतो. खडसे पक्षनेतृत्त्वावर एक प्रकारे आपल्याला मंत्री करण्यासाठी दबाव टाकत आहेत. दुसरीकडे, खडसे खरोखरच पक्ष सोडू शकतात. आयुष्यवर विरोधात राहिल्यानंतर सत्ता काळात तर त्यांच्यावर वनवास भोगण्याची वेळ येत असेल तर टोकाचा निर्णय घेऊ शकतात. आता नाही तर कधीच नाही हे खडसेंना लागू होते असेही त्यांचे समर्थक मानतात. त्यामुळे खडसे खरोखरच 40 वर्षापासून काम करत असलेल्या भाजपला सोडचिठ्ठी देणार की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईल.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती....

बातम्या आणखी आहेत...