आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांकडून बँक गॅरंटी घेणे बेकायदेशीर; विनाअनुदानित कॉलेजना सरकारची तंबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची खासगी विनाअनुदानित महाविद्यालये त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून पुढील वर्षाच्या शैक्षणिक शुल्कासंदर्भात बँक गॅरंटी व एक वर्षाच्या सेवेचे बंधपत्र घेतात. यासंदर्भात कायद्यात अशी तरतूद नाही. त्यामुळे या बाबी बेकायदा अाहेत. आजपर्यंत घेतलेल्या बँक गॅरंटी व बंधपत्रे बेकायदा आहेत. अशा बाबींची यापुढे मागणी केल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याची तंबी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शनिवारी दिली आहे.


खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून पुढील शैक्षणिक वर्षाच्या शुल्काची बँक गॅरंटी आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यांनतर संबंधित महाविद्यालयास एक वर्ष सेवा देण्याप्रीत्यर्थची बंधपत्राची मागणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने शनिवारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने एक स्पष्टीकरण जारी केले आहे. त्यामध्ये खासगी विनाअनुदानित  वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अशी बँक गॅरंटी आणि सेवेची बंधपत्रे मागता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकरणामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.


राज्यातील शासकीय व महापालिकांची जी वैद्यकीय व दंत महाविद्यालये आहेत, तेथे विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांवर होणारा खर्च हा जनतेच्या पैशातून केला जातो. त्यामुळे त्याची काही अंशी परतफेड व्हावी, म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका असे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाची विहित कालावधीत सेवा करावी असे बंधपत्र लिहून घेण्यात येते, ते मात्र कायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण या शासन निर्णयात केले आहे.

बातम्या आणखी आहेत...