आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती होणार, केंद्रात मंत्रिपदं स्वीकारणार या तर 'त्यांनी' पेरलेल्या बातम्या- संजय राऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 2019 मध्ये भाजप-शिवसेना यांची लोकसभा निवडणुकीकरता युती होणार तसेच केंद्रात शिवसेनेला तेलगूदेसम पक्षाची कॅबिनेटसह सर्व मंत्रीपदे देणार अशा बातम्या आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याची खिल्ली उडविली आहे. या पेरलेल्या बातम्या आहेत, तसेच अशा बातम्यांची शेती कोण करतयं हे सर्वांनाच माहित आहे अशी प्रतिक्रिया देत राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बुधवारी रात्री मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील आता हळूहळू बाहेर पडू लागल्याचे येत असलेल्या बातम्यावरून दिसत आहे. शिवसेना युतीसाठी तयार व्हावी यासाठी भाजपने पूर्वी तेलगू देसम पक्षाकडे असलेली सर्व खाती शिवसेनेला देण्याचा तसेच राज्यात आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव भाजपने दिल्याच्या बातम्या आल्या आहेत. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घ्या तसेच त्याची बोलणी सुरू करून युतीची घोषणा करा असे शिवसेनेने म्हटल्याचे या बातम्यांत म्हटले आहे. भाजप-सेनेच्या आगामी काळातही युतीबाबत बोलणी सुरू राहणार असल्याचे त्यात म्हटले आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे.

 

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेने 2016 मध्येच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. काही महिन्यापूर्वी स्वबळावर लढण्याबाबतचा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. शिवसेनेने एकट्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने कोणालाही कोणता फॉर्म्यूला दिलेला नाही किंवा तो स्वीकारला नाही. त्यामुळे फॉर्म्युला शिवसेनेने स्वीकारला किंवा तेलगु देसमची मंत्रिपदे आम्ही स्वीकारणार या सगळ्या पेरलेल्या बातम्या आहेत आणि याची उत्तम शेती सध्या कोण करतयं याची सर्वांनाच माहिती आहे असे सांगत भाजपवर निशाणा साधला.

 

अमित शहा यांच्याप्रमाणे देशातील चार राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यांना आम्ही शहा यांच्याप्रमाणेच त्यांनाही भेटीसाठी वेळ देणार आहोत. लवकरच त्यांची भेट होईल असे सांगत अमित शहांच्या भेटीला शिवसेना फारसे महत्त्व देत नसल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...