आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक नागरिकावर 64 हजार रुपयांचे कर्ज: जयंत पाटील, फडणवीस सरकारवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फडणवीस सरकार सत्तेवर येऊन तीस हजार तास झाल्याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. याच वक्तव्याचा संदर्भ देत राज्यातील शेतकरी आत्महत्या, हत्या आणि महिलांवरील अत्याचारांची आकडेवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली.

 

तसेच राज्यावर जवळपास ८ लाख कोटींचे कर्ज असल्याची बाब लक्षात घेतली, तर राज्यातील प्रत्येकावर जवळपास ६४ हजार रुपयांचे कर्ज असल्याचा मुद्दा त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत मांडला. अतिशय मार्मिक शब्दांत सत्ताधाऱ्यांची फिरकी घेत त्यांनी आपल्या भाषणादरम्यान धमाल उडवून दिली.  


केंद्र सरकारने त्यांच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय आरोग्य योजनेची घोषणा केली. त्यासाठी दोन हजार कोटींचा निधीही दिला, मात्र त्या महत्त्वाकांक्षी योजनेची साधी दखलही राज्याच्या अर्थसंकल्पात न घेतल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

 

फडणवीस सरकारच्या तीस हजार तासांमध्ये राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे दर नव्वद मिनिटाला एक आत्महत्या.. १७ हजार महिलांवर बलात्कार झाले, म्हणजे दर पंचाहत्तर मिनिटाला एक बलात्कार, दर तीन तासाला एक खून, तीस हजार महिलांचा विनयभंग, म्हणजे दर साठ मिनिटाला एका भगिनीचा विनयभंग झाला, अशी अाकडेवारी जयंत पाटील यांनी सादर केली तेव्हा सत्ताधारी बाकांवर शांतता पसरली हाेती.


महसुलाच्या विक्रमी तुटीचा अर्थसंकल्प असतानाही अर्थमंत्री हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतिपथावर नेणारा असल्याचा दावा करतात, त्याबद्दल ‘अर्थतज्ज्ञ’ मुनगंटीवार यांचे आपण अभिनंदन करत असल्याचा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

 

गेल्या वर्षीच्या १ जुलैपासून आपण जीएसटी कायदा लागू केला. त्यामुळे केंद्राचे उत्पन्न वाढल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला, मात्र राज्याला केंद्राकडून जो परतावा मिळणार होता त्यामध्ये जवळपास सहा हजार कोटींची घट आली. त्याबद्दलचा खुलासा अर्थमंत्र्यांनी करावा. सिंचन प्रकल्पांवर शेजारची राज्ये १६ ते २२ हजार कोटी रुपये खर्च करत असताना आपण आठ हजार कोटींची तरतूद केल्याबद्दल पाठ थोपटून घेत आहोत. आपल्या मित्रपक्षाच्या मुखपत्रात ‘खिशात नाही आणा, नुसता घोषणांचा घाणा’ अशी टीका केल्याचे सांगत शिवसेनाही अर्थसंकल्पावर नाराज असल्याचा दावा पाटील यांनी केला.

 

बातम्या आणखी आहेत...