आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाणे- जिल्हा रुग्णालयातून नवजात बाळाला चोरून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अन्य दोघांसह काही तासांतच अटक केली. या महिलेकडे अन्य चार बालकेही आढळून आली असून ती मानवी तस्कर असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुडिया सोनू राजभार (३५), सोनू राजभार (४०) आणि विजय कैलास श्रीवास्तव (५५) अशी आरोपींची नावे असून त्यांना कल्याण तालुक्यातील पिसावली येथील घरातून अटक करण्यात आली. ठाणे जिल्हा रुग्णालयात एका महिलेला रविवारी सकाळी बाळंतपणासाठी भरती केले होते. त्यानंतर काही तासांतच महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. दरम्यान, “तुमच्या आईला बाळ बघायचे आहे,’ असे सांगत एक महिला बाळंतीण महिलेकडून बाळाला घेऊन गेली आणि परत आलीच नाही. लागलीच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ठाणे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लागलीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंतच्या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली. रुग्णालय ते रेल्वे स्टेशनपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर आरोपी महिला पिसावली भागातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, तिच्या घरी धाड टाकून तिला पती सोनू आणि अन्य एका जणासह अटक केली.
आरोपीकडे चार बालकेही सापडली
पोलिसांनी गुडियाच्या घरावर धाड टाकल्यानंतर तिथे चार बालकेही सापडली. त्यातील ३ मुली असून एक मुलगा आहे. विशेष म्हणजे, मुलाचे वय अवघे दोन महिने आहे. त्यामुळे या सर्व बालकांचा आरोपी महिलेशी संबंधााची उलटतपासणी करण्यात येत आहे.
शिर्डीत नवजात अर्भकाला पळवणाऱ्या अाराेपींना अटक
शिर्डीतून पाच दिवसांच्या नवजात बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना शिर्डी पोलिसांनी अल्पावधीतच मुंबई येथून अटक केली, तर बालकास आईच्या ताब्यात दिले आहे. अपहृत बालकाचे वडील संजीव हरिभाऊ गोंडगिरे नगर-मनमाड महामार्गालगत देशमुख चारी (ता. राहाता) येथे राहतात. त्यांच्या ५ दिवसांच्या मुलाला शेजारी राहणाऱ्या आकाश सुरेश बाबर व त्याची बायको पूजा यांनी पळवून नेले होते. याबाबत शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी वेळीच सूत्रे हलवत आरोपी बाबरचा चेंबूर येथील पत्ता मिळवला आणि बालकाला परत मिळवले. आकाश बाबरला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.