आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमीभाव: 6 मार्च रोजी किसान सभेचा विधानभवनावर मोर्चा; 1 लाख शेतकरी होणार सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी (6 मार्च) नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. त्यात नगरसह राज्यभरातील एक लाख शेतकरी सहभागी होणार आहेत अशी माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. 

 

शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या व शेतीमालाला दीडपट हमी भावासाठी स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अधिवेशन काळात राज्यभरातून एक लाख शेतकरी नाशिक येथून मुंबई येथे विधानभवनावर पायी चालत येत लाँग मार्च काढणार आहेत. 6 मार्चला या लाँग मार्चची सुरुवात होणार आहे. नाशिक येथून मुंबईपर्यंत पायी चालत आलेले हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरू राहणार आहे. लाँग मार्चच्या तयारीसाठी राज्यभर जिल्हा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

किसान सभेने मार्च 2016 मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह केला होता. नाशिक येथील सीबीएस चौकात राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांनी दोन दिवस केलेल्या या महामुक्काम सत्याग्रहाने शेतकऱ्यांचे प्रश्न दोन वर्षांपूर्वी सरकार समोर मांडले होते. महामुक्कामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. 

 

एक जून 2017 च्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरही सरकारने या मागण्या पूर्ण करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांची वारंवार अत्यंत जीवघेणी फसवणूक केली आहे. किसान सभेने या पार्श्वभूमीवर नाशिकच्या याच सीबीएस चौकात पुन्हा एकदा एक लाख शेतकऱ्यांना एकत्र करत विधान भवनावर चालत जाण्याचा संकल्प केला आहे. 

 

6 मार्च रोजी राज्यभरातील एक लाख शेतकरी नाशिक येथून चालत मुंबईकडे निघणार आहेत. शेतकऱ्यांचा हा लाँग मार्च मुंबई येथे पोहोचल्यानंतर विधानभवनाला घेराव घालणार आहे. मागण्या धसास लागल्याशिवाय हा महाघेराव मागे घेतला जाणार नाही.

 

कष्टकरी शेतकऱ्यांना विना अट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना किमान 3000 रुपये पेन्शन द्या, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान 40 हजार रुपये भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान 40 रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यासाठी हा लाँग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहे. डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, किसन गुजर या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. नगर जिल्ह्यातून लाँग मार्चमध्ये सामील होणाऱ्या शेतकऱ्यांनी 6 मार्च रोजी 11 वाजता नाशिक येथील सीबीएस चौकात जमावे, असे आवाहन केले आहे. 

 

कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या-

 

सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा करत आहे. सरकारच्या या फसवणुकीमुळे शेतकरी आणखी खचले आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल 1753 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. किसान सभेने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आरपार लढा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...