आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई/कोल्हापूर- कोल्हापूरच्या विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. अनाथ मुलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी 1 टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापुरात या निर्णयांचे स्वागत कोल्हापूर येथील व्हीनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यासमोर साखर पेढे वाटून भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले. कोल्हापूरकरांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत होती. शहरातील विविध संस्था संघटनांनी वेळोवेळी राज्य सरकारला या मागणीसाठी निवेदन दिले होते.आज याच मागणीला विचारात घेऊन राज्य सरकारने छत्रपती राजाराम महाराजांचे नाव कोल्हापूर विमानतळाला देण्याचा निर्णय घोषित केला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी मोठे योगदान दिले. कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्याचे श्रेय छत्रपती राजाराम महाराजांना आहे. 1938 /1939 सालात त्यांनी कोल्हापुरात विमानसेवा सुरू केली होती. त्यांच्या दूरदृष्टीमूळेच येथील विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली जात होती.
विमानसेवा बंदच
राजाराम महाराजांचे नाव देण्यात येणाऱ्या कोल्हापूरच्या विमानतळावर सध्या मात्र विमानसेवा बंद आहे.विमानसेवा सुरू करण्याच्या चर्चेच्या गुऱ्हाळात कित्येकदा विमानसेवा सुरू होण्याच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र कधी तांत्रिक मुद्द्यावर तर कधी राजकीय श्रेयवादातून कोल्हापूरची विमानसेवा आयत्या वेळी उड्डाण घेता घेता अद्याप जमिनीवरच स्थिरावली आहे. केंद्र सरकारच्या उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्याने आता लवकरच कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याच्या हालचालीना वेग आला आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.