आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवारांना निमंत्रण, विरोधक शक्तीप्रदर्शन करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार कुमारस्वामी यांच्यासह (फाईल फोटो) - Divya Marathi
शरद पवार कुमारस्वामी यांच्यासह (फाईल फोटो)

मुंबई- कर्नाटकमध्ये एच डी कुमारस्वामी हे बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देवेगौडा कुटुंबियांनी निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. 

 

कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपविरोधी पक्षांना व त्यांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने काँग्रेससह विरोधी पक्ष शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या सोहळ्याला पवारांसह यूपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, अखिलेश यादव, मायावती, चंद्राबाबू नायडू, तेजस्वी यादव, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आदी नेते उपस्थित राहणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तामिळ अभिनेते रजनीकांत हेही नेते शपथविधीला हजर राहतील, असे सांगण्यात येते. यानिमित्ताने विरोध पक्ष शक्तीप्रदर्शन करत भाजपला संदेश देणार आहेत.

 

गेल्या मंगळवारी (15 मे) कर्नाटक विधानसभेचे निकाल आले होते. या निकालात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. 224 आमदारांच्या विधानसभेत भाजपला सर्वाधिक 104, काँग्रेसला 78 तर जेडी (एस) ला 37 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यास पाचारण केले होते. त्यानुसार भाजप नेते बी एस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने येड्डीयुरप्पा यांना शनिवारी (19 मे) रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेस-जेडी (एस)ला राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी 12.30 वाजता बंगळुरूमध्ये मोठ्या शक्तीप्रदर्शनासह कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे तर काँग्रेसला 20 तर जेडी (एस)ला 13 मंत्रीपदे असा सत्तेचा वाटपाचा फॉर्म्यूला ठरल्याचे समोर येत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...