आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडची महिला पाेलिस ललिता साळवेंना लिंगबदलास परवानगी, मुंबईत होणार शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे - Divya Marathi
महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे

नाशिक - शरीरात स्त्रीपेक्षा पुरुष गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याने त्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यातील महिला पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांना अखेरीस राज्य सरकारने लिंगबदलास परवानगी दिली आहे. नऊ महिन्यांपासून साळवेंचा विनंती अर्ज लालफितीत अडकला हाेता. अखेरीस २० मे रोजी साळवे यांना शासनाचे परवानगीचे पत्र प्राप्त झाले असून लवकरच मुंबईतील रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

 

लिंगबदलासाठी ललिता यांनी १९ सप्टेंबर रोजी पोलिस महासंचालकांकडे परवानगीसाठीचा अर्ज केला. परंतु साळवे यांची भरती स्त्री गटातून झाल्याने त्यांचा अर्ज नोव्हेंबरमध्ये फेटाळण्यात आला. त्यानंतरही त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला. लिंगबदलासाठी आपली ओळख खुली करणाऱ्या तसेच शासकीय सेवेतच राहून यासाठीची परवानगी मागणाऱ्या साळवे या पहिल्याच व्यक्ती असल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय गुंतागुंतीचा होता. अखेरीस साळवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली होती.

 

९ महिने संघर्षाचा काळ .

‘लिंगबदल शस्त्रक्रियेच्या परवानगीस केेलेला अर्ज ते शस्त्रक्रियेस मिळालेली परवानगी हा ९ महिन्यांचा काळ म्हणजे शारीरिक व मानसिक ‘संघर्षाच्या कळा’ देणारा होता, पण आता लिंगबदल शस्त्रक्रियेस परवानगी मिळाली आहे. इथून पुढचे आयुष्य माझ्यासाठी ‘नवा जन्म’ असेल. आता किती आनंद झालाय हे शब्दांत सांगू शकत नाही’ लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी मागितल्याने चर्चेत आलेल्या माजलगाव ठाण्यातील महिला पोलिस शिपाई ललिता साळवे सांगत होत्या.  

 

बीड जिल्ह्यातील राजेगाव (ता. माजलगाव) येथील रहिवासी असलेल्या ललितांना एक भाऊ व एक बहीण आहे. २०१० मध्ये त्या बीडमध्ये महिला पोलिस शिपाई म्हणून भरती झाल्या. यानंतर त्यांनी पोलिस क्रीडा स्पर्धांत खेळाची चुणूक दाखवत अनेक पदके पटकावली.  २०१६ पासून शरीरात होणाऱ्या पुरुषी  बदलांशी त्यांचा संघर्ष सुरू होता. ललिता म्हणतात, ‘एकीकडे घरात माझ्या लग्नाची चर्चा, तर दुसरीकडे शरीरात होणारे पुरुषी बदल यामुळे अखेर एक दिवस वडील, मामा, भाऊला विश्वासात घेऊन सगळे सांगितले. सुरुवातीला त्यांनाही धक्का बसला, पण त्यांनी साथ देण्याचा विश्वास दिला अन् या घुसमटीतून सुटण्यासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात जाऊन सर्व तपासणी केली, समुपदेशनानंतर लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

 

पण मला पोलिस दलातील नोकरी सोडायची नव्हती म्हणून १७ सप्टेंबर २०१७ रोजी पोलिस अधीक्षकांकडे शस्त्रक्रियेस परवानगीसाठी अर्ज केला. हा अर्ज महासंचालकांपर्यंत गेला. दरम्यानच्या काळात माध्यमांपर्यंत ही माहिती पोहोचली अन् बातम्या यायला लागल्या. मित्र, नातेवाईक, सहकाऱ्यांचे फोन सुरू झाले. हे सगळं माझ्यासाठी नवे होेते, मी गांगरून गेले. फोन बंद करून ठेवला. काही दिवस सगळ्यांशी संपर्क तोडला. मुंबईतच काही दिवस राहिले.  गावीही आई, वडील, भाऊ यांना हाच अनुभव. त्यांनीही काही दिवस गाव सोडले.

 

 आपण काही चूक केली का, असे क्षणिक वाटले, पण मी ठाम होते, कुटुंबीय पाठीशी होते आणि बातम्यांनंतर माजलगाव, बीडचे सामान्य नागरिकही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवले गेले, हे मात्र अनपेक्षित होते. यामुळे आत्मविश्वास वाढला. दरम्यान, पोलिस महासंचालकांनी सुरुवातीला नियमांच्या आधारे परवानगी नाकारली. मग नोव्हेंबर २०१७ मध्ये अॅड. अजिज नक्वींमार्फत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयानेही शरीरात होणाऱ्या बदलांमुळे लिंगबदल शस्त्रक्रिया हा नैसर्गिक अधिकार असल्याचे सांगत दिलासा दिला, शिवाय प्रश्न सेवेशी निगडित असल्याने मॅटमध्ये जाण्याचा सल्ला दिला. 

 

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने प्रश्न मार्गी   
मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर त्यांच्या सूचनेनंतर पोलिस खात्याने ललिता यांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करवून घेत शस्त्रक्रियेची गरज अाहे का, याची चाचपणी केली अन् गरज अाहे, असा अहवाल आला. त्यानंतर ललिता यांनी मार्च २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली अन् प्रक्रियेला गती मिळाली.

 

ललिताच्या जागी अाता ललितकुमार नामकरण
लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललिता आता ललितकुमार होणार आहेत. सोमवारी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना शस्त्रक्रियेस परवानगी मिळालेले पत्र दिले. सोमवारी रात्रीच ललिता शस्त्रक्रियेच्या पूर्वतपासणीसाठी रवाना झाल्या. मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया होणार आहे.

 

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, ललिता साळवेविषयी आणखी काही माहिती.....

बातम्या आणखी आहेत...