आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Less Than 86 Percent Of The Citys Children Can Not Read

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरच्या 86 टक्के मुलांना वाचता येईना दुसरीचे धडे; शाळाबाह्य मुलांची संख्या 48 हजारांवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एकट्या अहमदनगर जिल्ह्यात ८६ टक्के आणि सातारा जिल्ह्यातील ८७ टक्के किशोरवयीन मुले इयत्ता दुसरी स्तराचा मजकूरही वाचू शकत नसल्याचे धक्कादायक वास्तव आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. प्रथम या स्वयंसेवी संस्थेने २०१७ मध्ये केलेल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या एका पाहणी अहवालाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलांची संख्या जवळपास पन्नास हजारांवर गेल्याची बाबही आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.  


प्रथम या स्वयंसेवी संस्थेमार्फत संपूर्ण भारतातील २४ राज्यांमधील २८ जिल्ह्यांत ‘असर २०१७’ या उपक्रमांतर्गत शालेय शिक्षण विषयक पाहणी करण्यात आली असून या अहवालातील काही बाबी २०१७-१८च्या आर्थिक पाहणी अहवालात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधील १२० गावांमधील १९०० कुटुंबातील २ हजार ३२९ किशोरवयीन मुलांची शैक्षणिक क्रियाशीलता, क्षमता, जागरूकता आणि महत्त्वाकांक्षा या चार प्रमुख घटकांची तपासणी या पाहणीद्वारे करण्यात आली. नगर जिल्ह्यातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांपैकी ४.३ टक्के मुले शिक्षणबाह्य आहेत, तर सातारा जिल्ह्यात हे प्रमाण ६ टक्के इतके आहे. गंभीर बाब म्हणजे सोप्या अंकगणिताच्या आधारे भागाकार करू न शकणाऱ्या मुलांची टक्केवारी ६६ टक्के आणि वजाबाकी करू न शकणाऱ्या मुलांची टक्केवारी ७३ टक्के इतकी आहे. तर सातारा जिल्ह्यात हे प्रमाण अनुक्रमे ६० आणि ७५ टक्के इतके आहे. तसेच संपूर्ण इंग्रजी वाक्य वाचू न शकणाऱ्या मुलांची टक्केवारी ३३ टक्के, तर इंग्रजी शब्दही वाचू न शकणारी मुले ८३ टक्के इतकी आहे. सातारा जिल्ह्यात हेच प्रमाण अनुक्रमे २६.६ आणि ८७ टक्के इतके असल्याचे हा अार्थिक पाहणी अहवाल सांगतो.   


या शिवाय संपूर्ण राज्यात डिसेंबर २०१७ पर्यंत शाळाबाह्य मुलांची संख्या ४८ हजार ३७९ इतकी असल्याने शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.