आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी गुंतवणूक; सरकारने ‘फुगवला’ अाकडा, निर्यातीतही निम्म्याने झाली घट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याचे उत्पन्न २ लाख ४३ हजार कोटी रुपये असून राज्याचा खर्च २ लाख ४८ हजार कोटी असल्याने वित्तीय तूट ४५११ कोटी रुपये आहे. - Divya Marathi
राज्याचे उत्पन्न २ लाख ४३ हजार कोटी रुपये असून राज्याचा खर्च २ लाख ४८ हजार कोटी असल्याने वित्तीय तूट ४५११ कोटी रुपये आहे.

मुंबई- एकीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या चकचकीत सोहळ्यांमधून १२ लाख कोटींच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे दावे मुख्यमंत्री करत असताना राज्याचा यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल मात्र भलतेच चित्र स्पष्ट करत आहे. थेट परदेशी गुंतवणूक आणि परदेशी कंपन्यांच्या कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांची आकडेवारी ‘फुगवण्यासाठी’ चक्क गेल्या १७ वर्षांचे आकडे एकत्रित करण्याची करामत या अहवालात सरकारने केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा राज्याची निर्यातही जवळपास निम्म्यापेक्षा अधिक घटल्याचे जळजळीत वास्तवही या अहवालातून समोर आल्याने उद्योग वाढल्याचे सरकारचे दावे फोल ठरले आहेत.   


व्यवसाय सुलभीकरण, धोरणे, दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि कुशल मनुष्यबळ या घटकांच्या बळावर राज्यात थेट परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी नुकताच मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे केला. यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात परदेशी गुंतवणुकीची आकडेवारी देताना मात्र आपल्या कार्यकाळातील परदेशी गुंतवणुकीची आकडेवारी देण्याऐवजी राज्य सरकारने एप्रिल २००० ते सप्टेंबर २०१७ अशी तब्बल सतरा वर्षांची आकडेवारी दिली आहे. या सतरा वर्षांत राज्यात फक्त ६ लाख ११ हजार ७६० कोटींची गुंतवणूक आल्याचे हा अहवाल सांगतो. या शिवाय परदेशी कंपन्यांच्या आतापर्यंत मंजूर व कार्यान्वित प्रकल्पांची आकडेवारी फुगवून सांगण्यासाठी ऑगस्ट १९९१ ते डिसेंबर २०१७  अशी तब्बल २६ वर्षांची आकडेवारी देण्यात आली आहे. 


विशेष म्हणजे एवढी ‘बनवेगिरी’ करूनही या २६ वर्षांतील मंजूर व कार्यान्वित प्रकल्पांद्वारे झालेल्या परदेशी गुंतवणुकीचा आकडा २ लाख ९२ हजार २५२ कोटींच्या वर जात नाही. त्यामुळे निव्वळ मुख्यमंत्र्यांनी परदेशी गुंतवणुकीबाबत केलेले दाव्यांमधील पोकळपणा उघड होऊ नये, यासाठी हे आकडे फुगवण्याची बनवेगिरी केल्याचा अाराेप विराेधकांतून हाेत अाहे.   

 

राज्याची निर्यात घटली  
राज्यातून मुख्यत्वे रत्ने आभूषणे, पेट्रोकेमिकल्स, तयार कपडे, सुती धागे, धातू, धातू उत्पादने, शेतमालावर आधारित उत्पादने, अभियांत्रिकी उपकरणे, औषधे, प्लास्टिक वस्तू अशा वस्तूंची निर्यात केली जाते. २०१२-१३ मध्ये ३ लाख ६१ हजार ४६० कोटी, २०१३-१४ मध्ये ४ लाख ३४ हजार ५९१, सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४ लाख ४५ हजार ३४९ कोटी, त्यापुढील वर्षी म्हणजे २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४ लाख ३६ हजार ४३५ कोटींची निर्यात झाली. २०१६-१७ मध्ये ४ लाख ५१ हजार ९७८ कोटींची निर्यात राज्यातून झाली. यंदा मात्र फक्त १ लाख ८० हजार ८४४ कोटींवर हा निर्यातीचा आकडा आला.

 

विकासाच्या व्याख्येत बदल- सुधीर मुनगंटीवार

राज्याच्या विकासाच्या व्याख्येत यापूर्वी बी फॉर बारामत' आणि पी फॉर पुणे असा उल्लेख होत असे परंतु आता त्यात बदल झाला असून बी फॉर बल्लारपूर आणि पी फॉर पोखर्णा अशी नवी व्याख्या झाल्याचा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक पाहणी अहवालावार बोलताना विरोधकांना लगावला. मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्याची कर्ज घेण्याची क्षमता असल्याने कर्जाची चिंता न करता शांतपणे झोपावे अशी टीका विरोधकांवर करीत म्हटले की, राज्याची क्षमता प्रचंड असून केवळ देशातील २९ राज्यातच नव्हे तर जगातील १९३ देशात आपण पुढे जाऊ शकू परंतु त्यासाठी विरोधकांनी एकत्रित आले पाहिजे. जगात महाराष्ट्राचा विकासदर जास्त असून जगातील १९३ देशांचा विकास दर 3 टक्के आहे तर राज्याचा यंदाचा विकास दर ७.३ टक्के टक्के इतका असून हा सध्याच्या काळात सर्वाधिक दर असल्याचा दावाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...