आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

339 कोटी रुपयांसाठी सरकारने शिवरायांच्या पुतळ्याची उंची घटवली, घोड्याची रूंदीही केली कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी केली आहे. टीका होईल म्हणून केवळ तलवारीची उंची आराखड्यापेक्षा अधिक वाढवली आहे. एकूण स्मारकाची उंची जैसे थे ठेवली आहे. माहिती अधिकारातून मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, अाधी पुतळ्याची एकूण उंची १२१.२ मीटर, शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची ८३.२ मीटर व तलवारीची उंची ३८ मीटर इतकी ठेवली होती. खर्च कपातीसाठी पुतळ्याची उंची आता ७५.७ मीटर व तलवार ४५.५ मीटर केली अाहे. या बदलामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून ती १२१.२ मीटरच राहणार आहे, तर स्मारकाची एकूण उंची २१० मीटर असणार आहे. भाजप आमदार विनायक मेटे हे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. यासंदर्भात त्यांना विचारले असता, ‘प्रकल्प सल्लागार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्मारकाची ठेकेदार एल अॅड टी कंपनी बरोबर पत्रव्यवहार केला, मात्र कोणी उत्तर दिले नाही, असे सांगितले. 


राज्य सरकारने एल अॅण्ड टी कंपनीला स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली होती. त्यावर विरोधकांनी टीका करत पुतळ्याची उंची कमी करत चौथऱ्याची उंची वाढविण्यात आल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळून लावत पुतळ्याची उंची १२१.२ मीटरच राहणार असल्याचे विधिमंडळात सांगितले होते. 


छत्रपती शिवरायांचे हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार अाहे. या स्मारकासाठी गिरगाव चौपाटीपासून ३.५ किमी तर नरिमन पाॅइंटपासून २.५ किमीवर असलेल्या मोठ्या खडकाची जागा निश्चित झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ राेजी त्या खडकावर जलपूजन समारंभ पार पडला होता.


घोड्याच्या पुतळ्याची रुंदीही घटवली
महाराजांच्या घोड्याच्या पुतळ्याची रुंदी ९६.२ मीटर होती. मात्र, ती आता ८७.४ मीटर असणार आहे. एकुण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची उंची ९ मीटरने कमी झाली आहे. 


यासाठी खटाटाेप 
महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा खर्च ९७६ कोटी इतका येणार होता. नव्या आराखड्यात पुतळ्याची उंची आणि रुंदी कमी केली आहे. या बदलामुळे पुतळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पंचधातूंचा कमी वापर होईल. अश्वारूढ पुतळ्यासाठी ६३८ कोटी खर्च येईल व सरकारचे ३३९ कोटी वाचणार आहेत.


हा तर महाराष्ट्राचा अपमान - मुंडे
‘छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’ म्हणत सत्ता मिळवणाऱ्या भाजप सरकारने पैशासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली. हा महाराष्ट्राचा, छत्रपतींच्या सर्व अनुयायांचा अपमान आहे. ताे आम्ही कधीही सहन करणार नाही, असा इशारा विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. ३३८ कोटी नाही, तर ४०० कोटी खर्च झाले तरी चालतील; परंतु पूर्वीच्या जिरेटोपापासूनची उंची कमी होणार नाही याची खात्री सरकारने द्यावी. पुतळ्याची उंची आम्ही एक इंचही  कमी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, घाेड्याच्या पुतळ्याची रुंदीही घटवली... 

बातम्या आणखी आहेत...