आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीचा गोंधळ भोवला; मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सरकारने गतवर्षी खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनवण्याच्या प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराबद्दल मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक अनिल देशमुख यांना जबाबदार धरत निलंबित केले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला होता.


गेल्या वर्षी राज्याने केलेल्या तूर खरेदीत मोठा गोंधळ झाला होता. ५१ लाख क्विंटल तूर केंद्राने तर उर्वरित २५ लाख क्विंटल राज्याने खरेदी केली होती. त्यासाठी सुमारे १,३०० कोटींचा निधी राज्य सरकारने दिला होता. या तुरीची सरकारी व खासगी गोदामांत साठवणूक केली आहे. मात्र, या एवढ्या तुरीचे काय करायचे याबाबतीत मार्केटिंग विभागाने  परिणामकारक नियोजन केले नाही. विक्रीचेही नियोजन फसल्याने तूर खरेदीत राज्य सरकारची मोठी रक्कम अडकून पडली अाहे.

 

गतवर्षी झाले होते पाचपट उत्पादन
तूरीसारख्या पिकाचे उत्पादन घ्या, या सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गतवर्षी राज्यात १५.३३ लाख हेक्टरवर तूर पेरणी झाली होती. तुरीचे २०३ लाख क्विंटल इतके विक्रमी उत्पादन झाले. त्या अगोदरच्या वर्षातील ४४ लाख क्विंटलच्या तुलनेत हे उत्पादन पाचपट अधिक होते. परिणामी खुल्या बाजारातील तुरीचे भाव कोसळल्याने सरकारने खरेदी केंद्रांच्या माध्यमातून ४२५ रुपये केंद्राच्या बोनससह ५ हजार ५० रुपये या किमान आधारभूत किमतीने तूर खरेदी केली.

 

देशमुखांवर कारवाईचे कारण

१) सरकारने खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनवण्याचे काम स्वत:च्या मर्जीतील कंपनीला मिळावे यासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर होता.
२) या कंपनीकडे डाळ बनवण्याची सक्षम यंत्रणा नसल्याने निकषात बसवण्यासाठी निविदेच्या अटीत वारंवार बदल केले गेले. त्यामुळे पुरेशा क्षमतेने भरडाई होऊ न शकल्याने गोदामांमध्ये लाखो मेट्रिक टन तूर अजूनही पडून आहे.

३) शिवाय जी भरडाई झाली तीदेखील निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप झाला होता. शिवाय तूर खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनने घेतलेल्या १४०० कोटी रुपयांवर व्याजही द्यावे लागत आहे. हा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात मांडला होता.
४) गोंधळाला जबाबदार मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापक अनिल देशमुख यांना निलंबित करावे, अशी मागणीही मुंडे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार निलंबनाची कारवाई झाली.

बातम्या आणखी आहेत...