आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - हज यात्रेसाठी यंदा देशातून १ लाख ७५ हजार मुस्लिम नागरिक जाणार अाहेत. यात ४८ टक्के महिला असून त्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक विमानात १३ महिलांचे पथक असेल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच सर्वाधिक भाविक हजला जात असल्याचा दावा केंद्रीय
अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी केला.सर्वाधिक १९ हजार दिल्लीतून तर मुुंबई १४,२००, नागपूर २८००, तर अाैरंगाबाद येथून ३०५ भाविक यात्रेला जाणार अाहेत.
मुंबईच्या हज हाऊस येथे अायाेजित प्रशिक्षण शिबिराचा अाढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत नक्वी म्हणाले की, हज यात्रेसाठी भारताचा काेटा सलग दुसऱ्या वर्षी वाढवण्यात यश अाले. यंदा एकूण ३ लाख ५५ हजार ६०४ अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये पुरुष यात्रेकरूंचे १ लाख ८९ हजार २१७ तर महिलांचे १ लाख ६६ हजार ३८७ अर्ज होते. भारतीय हज समितीच्या माध्यमातून १ लाख २८ हजार तर खासगी एजन्सीच्या माध्यमातून ४७ हजार भाविक हज यात्रेला जाणार अाहेत. या वर्षीपासून हज यात्रेचे अनुदान बंद करण्यात अाले अाहे.
मागील वर्षी १ लाख २४ हजार ८५२ हज यात्रेकरूंच्या विमान भाड्यापाेटी विमान कंपन्यांना देण्यात अाले हाेते. यंदाच्या वर्षात १ लाख २८ हजार यात्रेकरूंच्या विमानभाड्यापाेटी विमान कंपन्यांना ९७३ काेटी रुपये देण्यात अाले. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम ५७ काेटींनी कमी अाहे. यंदा यात्रेच्या विमानाच्या भाड्यात लक्षणीय घट झाली अाहे. त्यामुळे या भाड्यात अकारण वाढ न करण्याबाबत विमान कंपन्यांना निर्देश दिले अाहेत, असे नक्वी म्हणाले.
हज यात्रेला जाण्यासाठी सुरक्षिततेचा भाग म्हणून महिलांबराेबर त्यांच्या रक्तातील एक तरी पुरुष नातेवाईक साेबत असणे सक्तीचे हाेते, परंतु अाता ही अट शिथिल करण्यात अाली अाहे. त्यामुळे यंदा १३०० महिलांनी ‘मेहरम’ शिवाय अर्थात पुरुष नातेवाइकाशिवाय हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला अाहे. या सर्व महिलांसाठी लाॅटरी पद्धतीचा अवलंब न करता यात्रा सुविधा उपलब्ध करून देण्यात अाली अाहे.
समुद्रमार्गे हिरवा कंदील
यात्रेसाठीच्या प्रशिक्षण शिबिरात सर्व राज्यांमधून ६२३ यात्रेकरू सहभागी झाले अाहेत. अाॅनलाइन अाणि डिजिटल मंचाच्या माध्यमातून हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक अाणि सुलभ करण्यात येत अाहे. देशातून हज यात्रेला समुद्रमार्गाने जाण्यासाठी साैदी अरब सरकारने हिरवा झेंडा दाखवला असून उभय देशांमधील संबंधित अधिकारी अावश्यक त्या अाैपचारिकता पूर्ण करत असल्याचे नक्वी यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.