आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ली काकांना पुतण्याची भीती वाटते; मंत्री कदम यांनी घतले राज ठाकरेंवर ताेंडसुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसेने प्लास्टिक बंदीला केलेल्या विरोधाचा पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी साेमवारी चांगलाच समाचार घेत राज ठाकरेंवर ताेंडसुख घेतले. ‘हल्ली काकांना (राज यांना) पुतण्याची (अादित्य ठाकरेंची) भीती वाटायला लागली आहे,’ या शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. मनसेने प्लास्टिक बंदीच्या निर्णयातील त्रुटींवर आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात कदम यांनी पत्रकार परिषद घेत अाराेपांचे खंडन केले.  


कदम म्हणाले, ‘काही पक्षांनी प्लास्टिक बंदीबाबत मागण्या केल्या आहेत. बंदी त्यांना मान्य आहे, पण पर्याय द्या, दंड जास्त आहे, असे त्यांचे आक्षेप आहेत. यामागे जनहिताच्या कळकळीपेक्षा राजकारण आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा प्लास्टिक बंदीत पुढाकार आहे, त्यामुळे मनसे विरोध करते आहे’, असा कदम यांनी दावा केला. ‘महाराष्ट्रात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली. बंदीवर आक्षेप घेण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वात पुढे आहे. 


प्लास्टिक बंदी करताना पर्याय दिला नाही, तसेच दंडाची रक्कमही अव्वाच्या सव्वा असल्याचे मनसेचे म्हणते आहे. मात्र, इतर राज्यांत अशीच दंडाची रक्कम आहे,’ असा दावा कदम यांनी केला. तसेच ५०० आणि १००० च्या दंडाला कोणी जुमानत नाही’, असे त्यांनी सांगितले.  


प्लास्टिक बंदीचा निर्णय हा मोदी यांच्या नोटाबंदीसारखा नाही. या निर्णयाची आम्ही सहा महिने आधी घोषणा केली. कोर्टाने तीन महिने वाढवून दिले. एसटी, बस स्टॉप, वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या. हे जर एखाद्या नेत्याला माहिती नसेल, तर त्यांचे ते अपयश आहे. अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये, असा टोला कदम यांनी राज यांचे नाव न घेता लगावला. 

 

बेराेजगारी गुजरातेत वाढेल, राज्यात नाही  
प्लास्टिक बंदीमुळे उद्याेगांचे नुकसान हाेत असल्याचा अाराेप हाेत अाहे. त्यावर कदम म्हणाले, ‘राज्यात येत असलेले ८० टक्के प्लास्टिक उत्पादन गुजरातमध्ये होते. त्यामुळे उद्योग बंद पडून गुजरातचे लोक बेराेजगार हाेतील, महाराष्ट्रातील नव्हे. उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाच्या परिसरात मनसेने प्लास्टिक बंदीच्या विरोधात बॅनरबाजी केली. पण, त्यापूर्वी त्यांनी मला विचारले असते तर त्यांच्या मनातील प्लास्टिक बंदीचा किंतु दूर केला असता’, असेही ते म्हणाले

 

बातम्या आणखी आहेत...