आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाजप मूग गिळून गप्प का - भाजप आ. डाॅ. आशिष देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर वैदर्भीय जनतेते भाजपचे कधी नव्हे ते ४४ आमदार निवडून दिले, राज्यात भाजपची सत्ता येऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला, दोन्ही ठिकाणी बहुमत असूनही भाजप वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर मूग गिळून गप्पच अाहे. त्यामुळे वैदर्भीय जनता भाजपवर नाराज असून गुजरातप्रमाणे विदर्भात भाजपवर नामुष्की ओढवणार असल्याचा दावा काटोलचे भाजप आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी केला.   


देशमुख म्हणाले, वेगळ्या विदर्भाची मागणी आपल्या पक्षाच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण विदर्भ आत्मबळ यात्रा काढली आहे. ही यात्रा विदर्भाच्या सर्व ६२ विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती आणखीन खालावली, जलयुक्त शिवारसारख्या गाजावाजा केलेल्या योजना कुचकामी ठरल्या असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली. मेक इन इंडियात विदर्भासाठी जाहीर झालेले प्रकल्प सुरू झालेले नाहीत. मराठवाडा आणि विदर्भाची एकत्रित आकडेवारी दाखवून विकासाचा भ्रम पसरवला जात आहे. इज डुईंग बिझनेस पूर्णपणे फेल गेले आहे, पतंजली सारख्या उद्योगांनी रोजगार निर्मिती केली नाही तर नुसते भूखंड लाटल्याची टीका त्यांनी केली. 

 
भाजप लहान राज्याचा समर्थक राहिला आहे. भुवनेश्वर येथील पक्षाच्या अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा ठराव पास झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांनी सात वेळा वेगळ्या विदर्भासाठी अशासकीय ठराव सभागृहात आणला होता. मग आताच वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव थंड बस्त्यात कसा गेला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीची आठवण करून देण्यासाठी आपण पत्र लिहिले. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. परंतु पक्षाने आपल्याला नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले. मी नोटिशीला उत्तर देण्याआधी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी माझ्या पत्राला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. आंध्रमध्ये तेलुगू भाषकांची दोन राज्ये झाली. हिंदीची तर अनेक राज्ये आहेत. 


मग मराठी भाषकांच्या दोन राज्यामुळे आपल्यात बेकी कशी काय निर्माण होते, असा सवाल त्यांनी केला. तसेच मराठी भाषेचे दोन राज्ये झाली तर मराठी भाषेची अस्मिता वाढेल. त्यासाठी शिवसेनेने वेगळ्या विदर्भाला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

 

सरकारवर साडेतीन लाख कोटींचा बोजा 
राज्यातील सरकारे बदलली, पक्ष बदलले, मात्र विदर्भाची परिस्थिती जैसे थे राहिली, असे सांगून महाराष्ट्रावर आजमितीस चार लाख कोटींचे कर्ज आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन अशा प्रकल्पांमुळे आणखी साडेतीन लाख कोटींच्या कर्जाचा बोजा पडणार आहे. अशा आर्थिक हलाखीत सापडलेल्या राज्याकडून विदर्भाचा काय विकास हाेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  

 

पर्याय खुले आहेत  
तुम्ही नाना पटोले यांच्या मार्गावर आहात काय, असा प्रश्न केला असता,  माझ्यासमोर पर्याय खुले आहेत, पण आमचा पक्ष मागण्यांची दखल घेईल अशी अपेक्षा आहे, असे उत्तर देशमुख यांनी या वेळी दिले. गडकरी, फडणवीस यांच्या काळात नागपूरचा विकास झाला, पण, नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नाही, असेही ते म्हणाले.  ७ जानेवारी रोजी सुरू झालेल्या देशमुख यांच्या विदर्भ आत्मबळ यात्रेचा समारोप १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र असलेल्या आशिष यांनी २००९ आणि २०१४ या दोन्ही विधानसभा भाजपच्या चिन्हावर लढवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...