आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ कामकाजात गांभीर्य राहिलेले नाही, शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांची खंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभेत सध्या मी जे काही पाहतोय ते दुर्दैवी आहे. इतके बेशिस्त सभागृह मागच्या ५० वर्षांत मी कधीच पाहिले नाही. विधिमंडळाचे कामकाजात कोणालाच गांभीर्य राहिलेले नाही. आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी कॅबिनेट मंत्री उपस्थित राहत नाहीत, अशी खंत शेकापचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत व्यक्त केली. 

 

अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा सुरू झाली. त्यावेळी आमदार देशमुख यांनी आपली खंत व्यक्त केली. गणपतराव देशमुख हे राज्य विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. ते तब्बल ११ वेळा निवडून आले आहेत. त्यांनी व्यक्त केलेली खंत गांभीर्याने घेत मंत्र्यांना ताकीद देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.   


देशमुख यांच्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे- पाटील, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा सभागृहातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली. विधिमंडळाच्या कामकाजात कोणतेच गांभीर्य राहिले नसल्याचे या सर्वांनी या वेळी बोलताना सांगितले.

 

विभागावर कारवाई
विधिमंडळात कामकाज सुरू असताना सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार यांनी मांडली. विरोधी पक्षातील आमदार प्रश्न विचारताना आणि मंत्री उत्तर देताना विरोधी पक्षातील आमदार उत्तर ऐकायला नसतात, ही परिस्थितीदेखील चांगली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लक्षवेधी प्रश्नावर लेखी उत्तरे दिली जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे दिलीप वळसे -पाटील यांनी केली. त्यावर सबळ कारणाशिवाय उत्तर देण्यास उशीर झाल्यास संबंधित विभागावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...