आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: यांना (भाजपला) आत्ताच आणीबाणी का आठवली...?- जितेंद्र आव्हाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आजारपणामुळे घरी आराम करत असलेले अर्थमंत्री अरूण जेटली यांनी घरी बसल्या परवा एक लेख लिहीला. २५ जूनला इंदिरा गांधी यांनी १९७५ साली जाहीर केलेल्या आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने जेटली यांनी भारताच्या इतिहासातील या "काळ्याकुट्ट" कालखंडाचं वर्णन केलं आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या इंदिराजींनी घटनेतील तरतुदींचा आधार घेत हुकूमशाही देशावर लादली. त्या काळात कसे अत्याचार झाले हे सांगून जेटली यांनी इंदिराजींची तुलना हिटलरशी केली. प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून समस्त जनतेला हा लेख वाचायचं आवाहन केलं. नेहरू गेले, इंदिरा आणि राजीव गांधी यांची हत्या झाली. तरी आजही त्यांचं चारित्र्यहनन करण्याची विकृती या लोकांना जडली आहे.

 

इंदिरा गांधींचा मी चाहता जरी असलो तरी मी आणीबाणीचा समर्थक नक्कीच नाही. लोकशाहीमध्ये आपल्या विरोधी भावना व्यक्त होऊ नये यासाठी केलेली नाकाबंदी हि लोकशाहीला मारकच असते. पण त्या बरोबर इंदिरा गांधींचा राजकीय प्रवास आणि त्यांनी घेतलेले निर्णय याची बरोबरी पुढच्या १०० वर्षांमध्ये कुठलेही नेतृत्व करू शकणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी हा देश राजा महाराजांच्या हातात होता हे कोणीही विसरू शकत नाही. स्वातंत्र्यानंतरही त्यांचा बोलबाला होता. पण एका रात्रीत संविधानाने त्यांना दिलेले तनखे बंद करण्यात आले आणि मालमत्ता राष्ट्रीयकृत करण्यात आल्या. त्याचदरम्यान बँका ज्या धनिकांच्या ताब्यात होत्या त्या सर्वसामान्यांच्या हितासाठी खुल्या करण्यात आल्या व त्यांचे देखील राष्ट्रीयकरण करण्यात आले.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना माणुसकीची आणि मानवतेची आठवण करत त्यांच्याच घरात जाऊन (व्हाईट हाऊस) आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू असे सांगत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. अमेरीकेचे सातवे आरमार पाकिस्तानच्या मदतीला जेव्हा अमेरीकेने पाठवले तेव्हा तुमच्या ह्या धमकीला आम्ही जुमानणार नाही असे लोकसभेत तर सांगितलेच, पण संध्याकाळी रामलीला मैदानावर जाहीर सभेत भारत असल्या धमक्यांना भिक घालणार नाही आणि ज्या उद्देशाने आम्ही लढायला सुरुवात केली आहे ती पूर्ण करु असे ठणकावून सांगितले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. 1974 साली अणुबॉम्ब चा स्फोट करुन भारताची नवीन ओळख जगाला करुन दिली आणि हळुच म्हणाल्या बुद्ध हसला.

 

भारताचे पहिले सॅटेलाईट अवकाशात गेल आणि तिथून राकेश शर्मा इंदिराजींना म्हणाला होता “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा”. तसेच (Land Selling) चा कायदा आणून गोर गरीबांमध्ये कसेल त्याची जमीन हा अभूतपूर्व निर्णय जमीनदारांच्या डोक्यात वरवंटा घालत घेतला. सिक्कीम हे स्वतंत्र प्रदेश असताना त्याच भारतामध्ये विलीनीकरण करुन घेतलं. त्याच दरम्यान युनिव्हर्सिटी मध्ये दलित, मागासवर्गीयांना आरक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी शिक्षण देणा-या शिक्षक आणि प्राध्यापकांमध्ये पण आरक्षण आणलं. आणि समतेचे समानतेचे धडे हे शिक्षणातून मिळाले पाहिजेत ही मानसिकता त्यांनी उभ्या भारताला करुन दिली.

 

1962 च्या पराभवानंतर पहिल्यांदा नथुला मध्ये सडेतोड उत्तर देत चीनचे नाक कापले. तर दुसरीकडे सियाचन मध्ये जाऊन तिरंगा फडकवणारी ती पहिली वाघीण होती. कोणी कितीही नाकारो पण त्यांच धर्मनिरपेक्षतेवर प्रचंड प्रेम होतं. हे त्यांच्या कृतीतून त्या सिद्ध करत होत्या. 1974 साली सुरु झालेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये जयप्रकाश नारायण उतरल्यानंतर त्यांनी दिलेल्या लष्कर आणि पोलीसांनी बंड करावे असे आवहान केले यामुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या. एकीकडे बांग्लादेश आणि श्रीलंकेमध्ये CIA चा हस्तक्षेप वाढताना जगाला दिसत होता देशामध्ये आराजकतेची परिस्थिती किंवा यादवी निर्माण होईल अशी त्यांना शंका वाटू लागली आणि त्यांनी आणीबाणी जाहीर केली. कदाचीत स्वयंकेंद्रीत नेतृत्व हे त्यामागचं एक कारण असावं. पण, दैदिप्यमान यशानंतर थोडाश्या स्वयंकेंद्रीत झालेल्या इंदिरा गांधींची आणीबाणी ही चूकच होती हे आजही मी म्हणतो.

 

नयनतारा सहगल हे नाव अनेकांना ठाऊक नसेल. आज वृद्धत्वाकडे झुकलेली ही झुंजार स्त्री त्या काळात आणीबाणीच्या विरोधात होती. व्यवसायाने पत्रकार/लेखिका असलेल्या सहगल, जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरीने आणीबाणीच्या विरोधात लढल्या. त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत काल प्रसिद्ध झाली. नयनतारा म्हणतात; इंदिराजींचे पुत्र संजय गांधी यांच्या बेताल वर्तनामुळे आणीबाणीची झळ सामान्य माणसाला लागली. कुटुंब नियोजनाचा उपक्रम त्यांनी उतावीळपणे राबवला. आधी लोकांचं प्रबोधन करायला हवं होतं. ते न केल्यामुळे ज्यांची ईच्छा नाही अशा अनेकांची जबरदस्तीने नसबंदी झाली. त्यामुळे संतापाची लाट उसळली. तथापि कुठल्या एका विशिष्ट जाती-धर्माच्या विरुद्ध हा कार्यक्रम नव्हता. आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातले सारेच लोक, हिंदू किंवा मुस्लिम, सारेच त्यात भरडले गेले. आपल्या आक्रस्ताळी मुलाला आवरणं इंदिराजींना कठीण गेलं. परंतु, त्यांना ज्या वेळी लक्षात आलं की हा सारा प्रकार हाताबाहेर जातोय, त्यांनी २१ महिन्यांत आणीबाणी मागे घेतली, निवडणूक जाहीर केली आणि जनतेच्या समोर गेल्या. ते राजकीय धैर्य त्यांनी दाखवलं.

 

आज मात्र देशात अधिकृतपणे घोषित झाली नसली तरी आणीबाणीपेक्षा धोकादायक अवस्था भारतात आहे कारण विशिष्ट जातिधर्माच्या लोकांना त्यात लक्ष्य केलं जात आहे असं सहगल पुढे म्हणतात. ज्यांनी आणीबाणी विरुद्ध संघर्ष केला त्या नयनतारा सहगल आणि जेटली यांचा वावदूकपणा यात तुलना करावी. तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारच्या असहिष्णूपणाच्या निषेधार्थ ज्या शेकडो साहित्यिक पत्रकारांनी आपले सरकारी पुरस्कार परत केले त्यात नयनतारा आघाडीवर होत्या.

 

आणीबाणीचा विषय निघालाच म्हणून सांगतो. त्या काळात इंटलिजन्स ब्युरोचे संचालक असलेले टी. व्ही. राजेश्वर यांचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं. 'भाजपाचा पूर्वावतार असलेला जनसंघ इंदिरा गांधी यांच्या विरोधात एकत्र आलेल्या जनता पार्टी या आघाडीत सामील झाला होता तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र आणीबाणीला आणि इंदिराजींना छुपा आणि नंतर उघड पाठिंबा देत होता. संघावर त्यावेळी बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस त्यांना मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यामार्फत वारंवार पत्रं पाठवून सुटकेसाठी क्षमायाचना करत होते. त्यांची किंवा संजय गांधी यांची कळवळून भेट मागत होते. इंदिराजींनी भेट तर नाकारलीच, पण त्या पत्रांना साधी उत्तरं सुद्धा दिली नाहीत', असा गौप्यस्फोट राजेश्वर यांनी केला आहे. 'इंदिराजींचा इतका धसका त्यांनी घेतला होता की १९७७ मध्ये काॅन्ग्रेसचा पराभव झाला, इंदिराजींची सत्ता गेली, तरी इंदिराजींवर काही खटले वगैरे भरू नका' असं आवाहन त्यांनी जनता पार्टीच्या सरकारला केलं होतं. संघाच्या या दुटप्पीपणाचे अजून किती पुरावे द्यायचे. इंदिराजींचे नेतृत्व किती पोलादी होते हे संघाच्या कृतीतून दिसते.

 

हिटलरचं नाव अरूण जेटली यांनी काढलं. नक्की कोण हिटलर हे कळण्याइतका मी त्यांच्यासारखा विद्वान नाही. पण हिटलरवरचा हा एक छोटासा व्हिडिओ सापडला. तो पहा. इंदिरा गांधी की आणखी कुणी हिटलरसारख्या होत्या याचा अंदाज घ्या. अरूण जेटली यांच्या मताशी सहमत असाल तर कळवा.

 

डॉ. जितेंद्र आव्हाड

 

बातम्या आणखी आहेत...