आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे पुन्हा जाेमाने निवडणुकीच्‍या तयारीत; विधानसभेला 150 ते 175 जागा लढवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या काही निवडणुकांत सपाटून मार खाणारी मनसे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जाेमाने कामाला लागली आहे. राज्यभरात विधानसभेच्या जवळपास दीडशे ते पावणेदोनशे जागा लढवण्याचा मनसेचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने  मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रव्यापी दौरा करणार आहेत. बुधवारी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  


पक्ष स्थापनेपासून दशकभराच्या कालावधीत मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे यासारखे शहरी भाग वगळता मनसेला फारसे यश मिळू शकले नाही. राज्यातल्या ग्रामीण भागात तर मनसेची पाटी राजकीयदृष्ट्या कोरीच राहिली आहे. त्यातच लोकसभा आणि विधानसभेतील या पराभवानंतर पक्षाला गळती लागली. राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले. काही कौटुंबिक अडचणींमुळे राज ठाकरेही गेल्या दोन-तीन वर्षांत राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय दिसले नाहीत. पक्षाला जणू मरगळ आलेली असतानाच अचानक मुंबईतील परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्याने मनसेला चांगलाच हात दिला.  परिणामी नेते आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा सक्रिय झाले असतानाच राज ठाकरेंनी पुढील निवडणुकांचे नियोजन सुरू केले आहे. बुधवारी रवींद्र नाट्यगृहात मनसेच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.   


पक्षनिरीक्षक दाैरा करून सादर करणार अहवाल  
राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधी पक्षाचे निरीक्षक विधानसभेच्या एकूण २८८ मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. हे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन पक्षाच्या सद्य:स्थितीची माहिती घेणार आहेत. मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर  त्याचा एक विस्तृत अहवाल तयार केला जाणार आहे. निरीक्षकांकडून आलेल्या या अहवालानुसार मनसेसाठी पोषक वातावरण असलेल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. निवडणुकीत सुमारे १५० ते १७० मतदारसंघांत पूर्ण तयारी आणि ताकदीनिशी उतरण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती मनसेच्या एका बड्या नेत्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...