आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे कार्यकर्त्यांनी नाणार प्रकल्पाचे कार्यालय फोडले; शिवसेनाही संघर्षासाठी तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुंबईतील ताडदेव येथील प्रमुख कार्यालयात घुसत मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी तोडफोड केली. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कोकणात होऊ देणार नाही, सरकारने काय करायचे ते करून घ्यावे, असे उघड आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर २४ तासांच्या आत मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही नाणार दौऱ्याचे आयोजन करत या मुद्द्यावर सरकारशी संघर्षाची तयारी केल्याने कोकणात ‘नाणार प्रकल्प राहणार की जाणार’ याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.  


वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड या नाणार प्रकल्पाच्या मुंबईतील मुख्यालयावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मनसेच्या पाच, सहा कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. संबंधित कार्यालय हे नाणार प्रकल्पाशी संबंधित असल्याची खातरजमा कार्यालयातील सुरक्षा रक्षकाकडे केल्यानंतर ही तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीची एक ध्वनिचित्रफीत माध्यमांवर व्हायरल झाली असून यात मनसे कार्यकर्ते शिवीगाळ करत तोडफोड करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या तोडफोडीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी नारळाचा वापर केला. पंचनाम्याच्या वेळी पोलिसांनी तोडफोडीसाठी वापरलेले दोन नारळ जप्त केले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. रविवारी मुंबईतील मुलुंड परिसरात झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होऊ न देण्याची घोषणा केली होती.  

 

 

२३ एप्रिल रोजी उद्धव नाणारच्या दौऱ्यावर  
मनसे या मुद्द्यावरून आक्रमक होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही २३ एप्रिलला नाणार येथे जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत ‘मातोश्री’वर सोमवारी एक बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत आणि सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या भेटीगाठी घेण्याचे ठिकाण तसेच एका जाहीर सभेचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...