आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज गळती दुरूस्ती व आधुनिकीकरणासाठी 5200 कोटींचा लवकरच आराखडा- ऊर्जामंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या 40 वर्ष जुनी असलेली राज्यातील वीज वितरण यंत्रणा दुरूस्ती आणि आधुनिकी करणासाठी 5200 कोटींचा आराखडा महावितरणने तयार केला असून ही योजना लवकरच मंत्रिमंडळासमोर नेणार असून, आगामी काळात संपूर्ण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान सभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

 

आमदार सुभाष पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव ग्रामपंचायत हद्दीतील महावितरणच्या एलटी वायर जीर्ण झाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ऊर्जामंत्री उत्तर देत होते. ते पुढे म्हणाले, वीज वितरण प्रणाली व यंत्रणा ही अत्यंत जुनी झाली आहे. ही यंत्रणा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करावी लागणार आहे.

 

रायगड जिल्ह्यातील मेस्को पाडा येथील विद्युत खांब जून 2017 मध्ये पडला. त्यामुळे 7 महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश देऊन 7-8 महिने झाले पण काम सुरू झाले नाही. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले असता ऊर्जा मंत्री बावनकुळे म्हणाले, आयपीडीएस योजनेसाठी 6 कोटी व दीनदयाल ग्रामज्योती योजनेसाठी 13 कोटी अनुदान केंद्रातर्फे या भागासाठी दिले आहे. 2019 पर्यंत ही कामे होतील. दरम्यान कंत्राटदाराला एक महिन्याचा वेळ देऊ. तरीही काम सुरू झाले नाही तर कंत्राटदारला बरखास्त करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले.

 

रायगड- रत्नागिरी हा वादळी भाग आहे. या भागातील वाहिन्या भूमिगत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून 200 कोटींचा आराखडा तयार केला आहे. अशी माहितीही ऊर्जामंत्र्यांनी दिली. या चर्चे दरम्यान सिंधुदुर्ग या जिल्ह्याचाही वादळग्रस्त म्हणून समावेश करण्याची मागणी करण्यात आली. 

 

महावितरणमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमी असल्याच्या प्रश्नावर उत्तर देतांना ऊर्जामंत्री म्हणाले, आता भौगोलिक परिस्थितीनुसार कर्मचारी भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे. तसेच ग्राम विद्युत व्यवस्थापक ही नवीन योजना आली आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला एक आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थी देणार. त्याला तांत्रिक प्रशिक्षण देणार व प्रत्येक गावात तो लाईमन सारख्या गावातील विजेच्या तक्रारी सोडवणार. 23 हजार ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविद्युत व्यवस्थापक नेमला जाणार असल्याचे ऊर्जामंत्री म्हणाले. याप्रश्नाच्या चर्चेत जेष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांच्यासह अनेक आमदारांनी उपप्रश्न विचारले.

 

घारापूरीत वीज ऊर्जामंत्र्यांचे सभागृहात अभिनंदन-

 

एलिफंटा लेण्यांमध्ये 70 वर्षात प्रथमच वीज पोहोचवल्याबद्दल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत आमदारांनी अभिनंदन केले. एक सकारात्मक मंत्री असून बऱ्याच वर्षानंतर ऊर्जा विभागाला चांगला मंत्री लाभला असा उल्लेख ही या प्रसंगी सभागृहात आमदारांनी केला.

 

आंगणवाड्यांना कमी दरात वीज- 

 

राज्यातील आंगणवाड्या, शासकीय शाळा, शासकीय हॉस्पिटल्स यांना सार्वजनिक सेवा या वर्गवारीतील कमी वीज दर आकारण्यात येतो. व्यावसायिक वीज दर लावला जात नाही. अशी माहिती ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली. आ. सदानंद चव्हाण यांनी हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात ऊर्जामंत्री पुढे म्हणाले, ज्या अंगवाड्यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे, त्यांचा बिलाचे समायोजन करून वीज पुरवठा पूर्ववत करता येईल, प्रसंगी वीज बिलाचे हफ्ते करूनही दिले जातील पण वीज बिल भरावे लागेल. आ. संजय केळकर, आ बाळासाहेब थोरात यांनी या चर्चेत उपप्रश्न विचारले.

बातम्या आणखी आहेत...