आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणात राजकारण आणून मोदी नेहरूंची जागा घेऊ शकत नाहीत : नवाब मलिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्व शिक्षा अभियानाचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिमावर्धन केले तरीही मोदी हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांची जागा घेऊ शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च करूनही उपयोग होत नसल्याने आता या सरकारने शिक्षणात राजकारण आणण्याचा उद्योग चालवल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकांद्वारे केंद्र सरकारने आपल्या योजनांची जाहिरातबाजी सुरू केली आहे.

 

त्यासाठी लहान मुलांच्या कॉमिक्समधील लोकप्रिय व्यक्तिरेखा असलेल्या चाचा चौधरींचा आणि मोदींचा संवाद या अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकातून घडवून आणण्यात आला आहे.   

अवांतर वाचनासाठीच्या या पुस्तकांचे वितरण मुलांना करण्यात येत असून शिक्षणाचा वापर आपल्या जाहिरातबाजीसाठी करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांविरोधात आता टीका होऊ लागली आहे.

 

या पुस्तकांमधील चाचा चौधरी आणि मोदी या दोघांच्या संवादातून मोठ्या खुबीने केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच मोदींनी जगभरात आपल्या नेतृत्वाचे श्रेष्ठत्व कसे मान्य करायला लावले, याचे रसभरीत वर्णनही या पुस्तकात करण्यात आले आहे. एकूणच मोदींच्या प्रतिमावर्धनाचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मलिक म्हणाले, सर्व शिक्षा अभियानांतर्गत अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकाद्वारे मुलांना शिक्षण देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा संवर्धनाचे काम केले जात आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये लोकप्रियता मिळवण्याचा कितीही प्रयत्न मोदींनी केला तरी ते चाचा नेहरू यांची जागा घेऊ शकत नाहीत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.  

 

मोदींचा उदो  उदो  
अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकात प्रत्येक घरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठीची उज्ज्वला योजना, मुलगी वाचवा - मुलगी शिकवा योजना, नोटबंदीच्या निर्णयाची प्रशंसा, डिजिटल इंडियासारखी केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना अशा योजनांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय मोदी देशासाठी कसे अविरत काम करत असतात याचाही उल्लेख या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...