आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य : मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर खासदार गाेपाळ शेट्टींचा राजीनामा मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ख्रिश्चन धर्मीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत आलेले भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राजीनामा देऊ केला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याने व पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनी भेट घेऊन चर्चा केल्याने राजीनामा परत घेतला आहे. स्वतः गोपाळ शेट्टी यांनीच "दिव्य मराठी'शी बोलताना ही माहिती दिली. 


मालाड मालवणीतील एका सभेत गोपाळ शेट्टी यांनी 'स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांची भूमिका नव्हती. कारण ख्रिश्चन म्हणजे ब्रिटिशच होते,' असे म्हटले होते. यामुळे ख्रिश्चन धर्मीयांमध्ये नाराजी पसरली होती. तर, दोन ख्रिश्चन व्यक्तींनी शेट्टींविरोधात पोलिसात तक्रारही दिली. मात्र, ख्रिश्चन धर्मीयांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे गोपाळ शेट्टी यांनी निवेदनातून म्हटले होते. तरीही त्यांच्याबाबतची नाराजी कमी झाली नव्हती. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे शेट्टी यांच्या या वक्तव्यावर नाराज होते. शेलारांच्या मतदारसंघात ख्रिश्चनांची संख्या माेठी अाहे. याचा फटका बसण्याची भाजपला भीती हाेती. त्यामुळे शेलार यांनी पक्षश्रेष्ठींना शेट्टींना समज देण्यास सांगितले होते. त्यावर पक्षश्रेष्ठींनी विधाने जपून करण्याचा सल्ला दिल्याने नाराज शेट्टींनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. 


माझ्या भाषणाचा विपर्यास : शेट्टी 
शेट्टी म्हणाले, मी कधीही कुठल्या धर्माविरोधातही बोललेलो नाही. भाषणात इंग्रज ख्रिश्चन असे म्हणण्याऐवजी ख्रिश्चन ब्रिटिश असल्याचा उल्लेख चुकून झाला. माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला. माझे अनेक कार्यकर्ते ख्रिश्चन आहेत. मी खुलासाही केला होता. परंतु, पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून मी राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दानवे, आशिष शेलार यांनीही माझ्याशी फोनवरून चर्चा केली. पक्ष प्रवक्ते माधव भंडारी मला भेटायला आले. सगळ्यांशी चर्चा करून पक्षहितासाठी मी राजीनामा परत घेतला', असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

बातम्या आणखी आहेत...