आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेच्या तिकीटासाठी उदयनराजे राष्ट्रवादी व भाजपला खेळवताहेत- शिवेंद्रराजे भोसले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभा तिकीटासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी भाजपला खेळवत आहेत. त्यांना ना राष्ट्रवादीचे प्रेम आहे ना भाजपची आपुलकी. पण लोकसभेला आपल्याविरोधात कोणीही उमेदवार तयार होऊ नये म्हणून उदयनराजे दोन्ही पक्षाला खेळवत आहेत, असा गंभीर आरोप सातारचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सोमवारी केला.

खासदार उदयनराजे यांनी शनिवारी साता-यात पत्रकार परिषद घेत आमदार शिवेंद्रराजे, रामराजे निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर टीका केली होती. त्याला शिवेंद्रराजे यांनी आज उत्तर दिले.

 

शिवेंद्रराजे म्हणाले, उदयनराजे म्हणाले काल परवा खलनायक म्हणाले. पण मला खलनायकाची भूमिका का घ्यायला लागली याचा विचार त्यांनी करावा. तुमचं राजकारण जर तुम्ही प्रेम चोप्रासारखं करणार असाल तर मी अमोल पालेकरांची भूमिका घेऊ शकत नाही. उद्यनराजेंकडे कामाबाबत बोलायला काहीही मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक टीका करू लागले आहेत. कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते. कॉलर उडवायला अक्कल लागत नाही. हे काम केले नाही तर मी हॅव करेन आणि तॅव करेन. पण ही नुसती डायलॉगबाजी. तुम्ही कामे काय केली ती सांगा असे आवाहन शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना केले. 

 

उदयनराजे खरंच राष्ट्रवादी व भाजपला खेळवताहेत का?

 

खासदार उदयनराजेंविरोधात मागील काही महिन्यांपासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीने मोर्चा खोलला आहे. स्थानिक नेत्यांनी उदयनराजेंना जवळपास दुर्लक्षित केले आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व आमदारांनी उदयनराजेंना लोकसभेचे तिकीट देऊ नये असे कळविले आहे. त्यामुळे पवारांनाही स्थानिक नेत्यांना सहजासहजी डावलता येणार नाही. मध्यंतरी साता-यात गेल्यानंतर पवारांनी कॉलर उडविणारे माझ्यासमोर सरळ होतात असे सांगत उदयनराजेंन लक्ष्य केले होते. त्यानंतर उदयनराजेंनी भाजपशी जवळिक वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला.

 

याचाच भाग म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साता-यात बोलावले. नंतर 3 जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनाला परळीत गोपीनाथ गडावर हजेरी लावली. त्यानंतर राजेंनी 5 जून रोजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दुसरीकडे, 10 जून रोजी राष्ट्रवादीचा पुण्यात 20 वा स्थापना दिवस व हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. या मेळाव्याला खासदार उदयनराजेंनी दांडी मारली.

 

पुण्यात असूनही राजेंनी पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. मात्र, मेळाव्याच्या आधी दोन तास पक्षाध्यक्ष शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी लोकसभेचे तिकीट नाकारेल या भीतीने राजे भाजपशी जवळिक साधत आहेत. तर साता-यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दूर केल्याने थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांशी संवाद राखत आहेत. त्यामुळे शिवेंद्रराजे यांनी राजे भाजप व राष्ट्रवादीला खेळवत आहेत, या आरोपात तथ्य असल्याचे दिसते. 

बातम्या आणखी आहेत...