आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- राज्यातील ३९ लाख कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे महावितरण कंपनीची २३ हजार कोटी रुपयाची थकबाकी असून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र हे विभाग आघाडीवर आहेत. मात्र, महावितरणने वीजगळती म्हणजेच भ्रष्टाचार लपवण्यासाठी कृषी पंपाची वीज बिले वाढवून दिली असून थकबाकीचा आकडा फुगवला आहे, असा वीज क्षेत्रातील संघटनांनी आरोप केला आहे.
कृषी पंप शेतकऱ्यांच्या थकबाकीचा फेब्रुवारीअखेर आकडा २२ हजार ८९१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यात मराठवाड्याचा ८,०९४ कोटींचा तर पश्चिम महाराष्ट्राचा ६,९४७ कोटींचा वाटा आहे. विदर्भात ३,६७२ कोटी तर उत्तर महाराष्ट्रात ४,१४९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सर्वात कमी ७ कोटींची थकबाकी कोकणातील आहे. पंपांना मीटरच नसल्याचा फायदा उचलत महावितरण ३ एचपी पंपाला ५ एचपी पंपचे, ५ पंपाला ७ पंपाचे, तर ७ एचपी पंपाला ९ एचपी पंपाचे वीज बिल आकारत आहे. एका कृषी पंपांचा वर्षाचा वीज वापर १,०६४ तास असल्याचा अहवाल कृषी पंप वीज वापर सत्यशोधन समितीने दिला आहे. तरीसुद्धा महावितरण एका कृषी पंपाचा वर्षाचा वीज वापर दोन हजार तास पकडून बिल काढते आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगलेला असल्याचे वीज क्षेत्रातील संघटनांचे म्हणणे आहे.
बिले दुरुस्तीचे काम केले जाणार
कृषी पंपांचा वीज वापर वाढलेला दाखवून अनुदान लाटण्याचा महावितरणाचा भ्रष्ट कारभार मुख्यमंत्र्यांच्या कानी घालण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या दुरुस्तीचे आदेशही दिले आहेत. १५ आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांची वाढवून दिलेली बिले दुरुस्तीचे काम चालणार अाहे. त्यानंतर नवी कृषी संजीवनी योजना येईल, असा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने दावा केला आहे.
बिलामध्ये ५३ टक्के रक्कम वाढवलेली
शेतकऱ्यांकडील थकबाकीतील दंड आणि व्याज १० हजार कोटींचे आहे. ते वगळल्यास शेतकऱ्यांकडील मुद्दल १२ हजार कोटी उरते. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलेल्या वीज बिलात ५३ टक्के रक्कम वाढवलेली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे मूळ बिलातील थकबाकी ६ हजार कोटीच उरते. कृषी संजीवनी योजनेमध्ये व्याज, दंड माफ आणि मुद्दलातील अर्धी रक्कम भरायची असते. त्यामुळे शेतकऱ्याकडील ६ हजार कोटी थकीतची अर्धी रक्कम ३ हजार कोटी उरते. म्हणूनच महावितरण सांगत असलेला कृषी पंपाच्या थकीत बिलाचा २३ हजार कोटींचा आकडा पूर्णपणे चुकीचा अाहे. तसेच कृषी पंपाचा थकीत बनावट आकडा सांगून महावितरण कंपनी शेतकऱ्यांना बदनाम करत आहे, असा आरोप वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व जनता दलाचे नेते प्रताप होगाडे यांनी केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.